भारताचा पाकिस्तानवर सात गडी राखून विजय

मिरपूर- आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीतील पहिल्या लढतीत भारताने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी १३१ धावांचे आव्हान ठेवले होते. विजयाचे हे लक्ष्य भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात आणि नऊ चेंडू राखून पार केले.या विजयासह ‘गट-ब’ मध्ये दोन गुण मिळवून भारताने आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. धवन २४ धावांवर बाद झाल्यानंतर शर्माही ३० धावांवर बाद झाला. या दोघांपाठोपाठ युवराज सिंग केवळ एक धाव काढून बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था तीन बाद ६५ अशी झाली होती. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारताला सहज विजय मिळून दिला.  त्याआधी शेर बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर सुरु झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कामरान अकमल आणि अहमद शहझाद यांनी पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली. 

भारताच्या भुवनेश्वर कुमारने कामरान अकमल याला आठ धावांवर धावबाद करुन भारताला पहिले यश मिळवून दिले. अकमल बाद झाला तेव्हा पाकिस्तानची अवस्था एक बाद नऊ अशी होती. त्यानंतर मोहम्मत हफीझ आणि अहमद शहझाद यांनी तिस-या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. ही जोडी मोठी धावसंख्या उभाकरेल असे वाटत असतानाच मोहम्मद हफीझला रवींद्र जडेजाने १५ धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ शहझादला अमित मिश्राने २२ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या शोएब मलिक आणि उमर अकमल यांनी चौथ्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. ही जोडीही मिश्राने फोडली त्याने मलिकला १८ धावांवर बाद करुन भारताला चौथे यश मिळवून दिले.  अखेरच्या षटकांमध्ये धावा काढण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने तीन गडी गमवले. २० षटकात पाकिस्तानला १३० धावा करता आल्या. उमर अकमलने सर्वाधिक ३३ धावा केल्या. तर भारताकडून अमित मिश्राने दोन, तर मोहम्मद शामी, रविंद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

Leave a Comment