आईस्क्रीम कंपन्यांत जुंपले फ्लेवर युद्ध

उन्हाळ्याची चाहुल लागल्याने वाढणारी मागणी लक्षात घेऊन देशातील आईस्क्रीम उत्पादक कंपन्या नवनवीन फ्लेवरची आईस्क्रीम आणण्यात गुंतल्या असून ग्रामीण बाजारातील वाढती मागणी लक्षात घेऊन छोट्या आणि स्वस्त पॅकच्या निर्मितीकडेही या कंपन्या अधिक लक्ष देत असल्याचे दिसून आले आहे. सर्वच कंपन्या आगळ्या स्वादाची आईस्क्रीम बाजारात आणण्यासाठी तयारीला लागल्या आहेत आणि त्यातून जणू त्यांच्यात कोल्ड वॉरचीच सुरवात झाली आहे.

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे आंब्यांचे दिवस. आंबा हे फळ आबालवृद्धांच्या खास पसंतीचे. त्यामुळे बहुतेक सर्व कंपन्यांनी आंब्याचे विविध स्वाद बाजारात आणण्याची तयारी चालविली आहे. आंब्याची विविध स्वादाची सुमारे १ डझन नवी उत्पादने यंदा बाजारात येतील असे सांगितले जात आहे.एकूण उलाढालीतील ४० ते ४५ टक्के उलाढाल एप्रिल ते जुलै या महिन्यांतच होत असल्याने या काळात दरवर्षीच नवीन स्वाद आणण्याकडे कंपन्यांचा कल असतो असे देशातील नंबर १ चे उत्पादक वाडिलाल यांचे म्हणणे आहे. त्यांच्या व्यवसायाची उलाढाल वर्षाला ५५० कोटींची आहे.

यंदा सँडे पॅकबरोबरच पारंपारिक पिस्ता, बदाम, व्हॅनिला, ब्लॅक करंट, कॅरामल स्वाद विविध प्रकारात म्हणजे कँडी, कोन, कप बरोबरच रियुजेबल कपातूनही उपलब्ध करून दिले जात आहेत. अंजीर, आम चस्का म्हणजे आंबा पल्प भरलेली कँडी आंब्यांच्याच आकारात तसेच पार्टी पॅकमध्ये मिळणार आहेत. रेमल क्रंच, कोको रश कँडी अगोदर पासूनच लोकप्रिय आहेत. ग्रामीण भागात वाढत चाललेला सेल आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन ५ रूपयांतील लहान साईज कँडीही यंदा बाजारात आणल्या जात आहेत. चॉकोशॉट हा नवा प्रकारही यंदा चाखता येणार आहे.

देशातील आईस्क्रीम व्यवसायाची वार्षिक उलाढाल ३ हजार कोटींच्या घरात आहे. त्यातील ब्रँडेड कंपन्यांचा वाटा १६०० कोटींचा असून बाकी वाटा देशभरातील स्थानिक आईस्क्रीम उत्पादकांचा आहे.

Leave a Comment