पुण्यातील राजकीय रंगपंचमी

पुणे (विशेष प्रतिनिधी) –  पुण्यात जोरदार रंगपंचमी तरूणांनी साजरी केली. याच रंगपंचमीच्या दिवशी काँग्रेसच्या दोन गटात राजकीय रंगपंचमी बघायला मिळाली. काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्यासाठी खुद्द अजित पवार यांनी काँग्रेस भवनात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवक, आमदांची बैठक घेऊन ते तब्बल पंधऱा वर्षानंतर प्रथमच काँग्रेसच्या रंगात रंगले.दुसरीकडे विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांनी पुढील दिशा ठरवण्यासाठी समर्थकांची बैठक घेऊन त्यात कलमाडींचे निलंबन मागे घेण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी करून राजकारण अधिक रंगीत केले. भाजपचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नसल्याने महायुतीत मात्र निवडणुकीचा रंग चढलेला बघायला मिळाला नाही.

अजित पवार रंगले काँग्रेसच्या रंगात !

पुण्यातून विश्वजीत कदम यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवक, आमदारांची बैठक अजित पवार यांनी आजच काँग्रेस भवनात बोलवली होती. त्याला झाडून सर्वजण हजर होते. दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, इतर आमदार, नगरसेवक हजर होते. त्यात विश्वजीत कदम यांना निवडून आणण्याचा निर्धारही करण्यात आला. नेत्यांनी दमबाजी केली. आम्ही आणि शहर काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र निर्माण कऱण्याचा अजित पवारांचा हा डाव होता. त्यामुळेच चोवीस तासांच्या सूचनेवर ही बैठक घेण्यात आली. या निमित्ताने अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर म्हणजे 1999 नंतर प्रथमच काँग्रेस भवनात आले.

मागच्या सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवार यांनी कलमाडी यांच्या प्रचाराचा शुभारंभ काँग्रेस भवनातील जाहीर सभेने केला होता. त्या सभेला अजित पवार येणार होते पण ते फिरकलेच नाहीत. त्यानंतर एकाही सभेत अजित पवार फिरकले नाहीत. मात्र यावेळी कलमाडी हे काँग्रेसमधून निलंबित असल्याने ते काँग्रेस भवनात येऊ शकत नाहीत हे माहिती असल्यानेच अजित पवार यांनी ही खेळी केल्याची चर्चा काँग्रेस भवनात होती. अन्यथा उमेदवारी अर्जही दाखल केलेला नसल्याने या बैठकीची इतकी घाई कशासाठी केली.अशीही शंका घेतली जात आहे. त्यामुळे आजही रंगपंचमी अजित पवार. सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस भवनात काँग्रेसच्या रंगात साजरी केली.

कलमाडीचे निलंबन मागे घेण्यासाठी समर्थकांची रंगपंचमी !

काँग्रेस भवनातील आजच्या बैठकीची कुणकुण लागताच कलमाडी यांनी आजच दुपारी चार वाजता आपल्या समर्थकांची बैठक घेतली. काल ते पुण्यात आल्यावर त्यांचे नेहमीच्या थाटात स्वागत करण्यात आले. विमानतळावरच कलमाडी यांनी आजच्या बैठकीत समर्थकांशी चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करू असे सांगितले असल्याने माध्यमांच्या लेखी या बैठकीचे महत्व अधिक होते.कलमाडींच्या बंगल्यावर झालेल्या या बैठकीत आमदार रमेश बागवे, उपमहापौर बंडू गायकवाड यांच्यासह बारा-तेरा विद्यमान नगरसेवक हजर होते. या शिवाय अनेक माजी नगरसेवकही हजर होते. शहर काँग्रेसचे अनेक पदाधिकारी हजर होते. त्यात दलित, मुस्लिम कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. या बैठकीत कलमाडींची साथ कशासाठी हवी आहे तर काँग्रेसला विजयी करण्यासाठी, मग त्यांची इतकीच गरज आहे तर मग त्यांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी समर्थकांनी यावेळी केली. एकीकडे कलमाडींना भ्रष्टाचाराचे आरोप आहेत म्हणून निलंबित करता अन दुसरीकडे त्यांना काँग्रेसच्या उमेदवारासाठी काम करायला सांगता हा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घ्यावे अशी जोरदार मागणी त्यांच्या समर्थकांची आहे.

अल्पसंख्यांक कलमाडींच्या पाठिशीपुण्यातील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजासाठी इतर कोणत्याही नेत्याने जेवढे काम केलेले नाही तेवढे काम सुरेश कलमाडी यांनी केले आहे. त्यामुळे त्यांनी विचार करून निर्णय घ्यावा, ते जो निर्णय घेतील तो आम्हा अल्पसंख्यांकांना मान्य असेल अशी ग्वाही पी. ए. इनामदार यांनी बैठकीत दिली. यावेळी इतर समाजातील कार्यकर्त्यांनीही ते कमलाडींच्या बरोबर असतील असे सांगितले. यावर आपण उद्या (शनिवारी) आणखी काही समर्थकांशी चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय जाहीर करून असे कलमाडी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, भाजप सोडून अन्य काही पक्षांशी आपली चर्चा झाली आहे. पण निर्णय दोन दिवसांनीच घेतला जाईल. यावेळी त्यांनी भाजपने अद्याप पुण्यातील उमेदवार जाहीर केलेला नसल्याकडेही लक्ष वेधले.

महायुतीत निवडणुकीचा रंगच नाही !

पुण्यातील जागा सेनाभाजपआरपीआयच्या महायुतीत भाजपकडे आहे. या पक्षाचे आमदार गिरीष बापट, शहराध्यक्ष अनिल शिरोळे हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. प्रदेश भाजपमध्ये नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे असे दोन गट आहेत. या दोन्ही नेत्यांच्या वादात भाजपची उमेदवारी अकडली आहे. उमेदवाराच्या नावावर एकमत होऊ शकत नसल्याने अखेर सर्वाधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांना देण्यात आले आहेत. बापट आणि शिऱोळे हे दोघेही आपल्यालाच तिकीट मिळेल यावर ठाम आहेत. काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर लगेचच भाजपचाही होईल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. तसेच उमेदवार कोणीही असो महायुतीच्या कार्यकर्त्यांचे विधानसभानिहाय मेळावे घेण्याचे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठरले होते. पण अद्याप असा एकही मेळावा झालेला नाही. त्यामुळे एकीकडे देशात नरेंद्र मोदी यांचे वातावरण दिसत असताना पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर नाराजीची छाया पसरली आहे. त्यांना या जल्लोषात समील व्हायचे असले तरी उमेदवार ठरत नसल्याने काहीच करता येत नाही अशी त्यांची गत आहे. त्यांच्या नेत्यांकडे उमेदवार कधी जाहीर होईल अशी विचारणा केल्यावर आज संध्याकाळपर्यंत होईल असे उत्तर सकाळी मिळते. त्याच दिवशी संध्याकाळी उद्या नक्की होणार असे सांगण्याशिवाय हे नेते काहीच करू शकत नाहीत. पुण्यात काँग्रेस विरूध्द भाजप अशी लढत असली तरी त्यात मनसे आणि आम आदमी पार्टीच्या उमेदवरांनी चांगले रंग भरले असल्याने भाजपच्या उमेदवाराची प्रतिक्षा कार्यकर्त्यांना आहे. उमेदवारा अभावी आज महायुतीचे कार्यकर्ते निवडणूकीच्या रंगात रंगलेच नाहीत.

Leave a Comment