घोलप संकटात

महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार असताना अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केले. अण्णा हजारे यांनी त्यांच्या संबंधात अनेक तक्रारी केल्या. त्या काळात माहितीचा अधिकार कायदा झाला नव्हता त्यामुळे अण्णांना या मंत्र्यांच्या विरोधात माहिती गोळा करताना फार त्रास झाला. या मंत्र्यांनी अण्णांच्या विरोधात कारवाया केल्या, त्यांच्यावर दबाव आणला पण अण्णांनी त्यांना जुमानले नाही. अशा प्रकरणात देर है लेकीन अंधेर नही असा अनुभव येत असतोेतसेच झाले आहे. बबनराव घोलप मंत्री होण्याआधी गरीब होते मग मंत्री झाल्यावर ते आणि त्यांच्या पत्नी एवढ्या श्रीमंत कसे झाले असा प्रश्‍न उपस्थित करून अण्णांनी त्यांना घेरले होते. अण्णांच्या तेव्हाच्या प्रयत्नांना आता यश येत आहे. बबनराव घोलप यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. एखाद्या लोक प्रतिनिधीला सत्र न्यायालयासारख्या कनिष्ठ न्यायालयात सुध्दा भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल शिक्षा सुनावली गेली तर त्याचे आहे ते पद आधी रद्द केले जावे  असा नवीन कायद्ा झाला आहे आणि त्या कायद्याखाली  खासदारपद गमावणारा पहिला नेता म्हणून भारतातले कुप्रसिध्द नेते लालूप्रसाद यादव यांचे खासदारपद गेलेले आहे. आता तोच मान शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांना मिळणार आहे. कारण त्यांच्यावर गेली तीन वर्षे चाललेल्या बेहिशेबी मालमत्ता कमावण्याच्या खटल्यात त्यांना शिक्षा सुनावली गेली आहे. 

 त्यांना या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपिल दाखल करता येणार आहे. परंतु त्या अपिलाचा निकाल लागेपर्यंत खालच्या न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मिळणार नाही. म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप सिध्द झाल्यामुळे राजकारणात जी शिक्षा व्हायची आहे ती त्यांना आता होणारच आहे. आता बबनराव घोलप आमदार नाहीत. त्यामुळे त्यांचे आमदारपद जाण्याचा मुद्दा अजूनतरी उपस्थित झालेला नाही. मात्र त्यांनी आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. २००९ सालच्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर भाऊसाहेब वाक्चौरे निवडून आले होते. परंतु ते मुळात कॉंग्रेसवालेच होते. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत मतदारसंघात वाहत असलेल्या वार्‍याचा अंदाज घेऊन शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये उडी मारली. त्यांच्या या पक्षांतरामुळे आता शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार कोण असा प्रश्‍न निर्माण झाला होता. पण तो उध्दव ठाकरे यांनी सोडवला आणि बबनराव घोलप मैदानात उतरतील अशी घोषणा करून टाकली. 

आता या मतदारसंघात भाऊसाहेब वाक्चौरे विरुध्द बबनराव घोलप असा सामना रंगण्याची चिन्हे दिसायला लागली असतानाच घोलप यांच्यावरचा हा खटला निकाली निघाला आणि बबनराव घोलप आता मैदानात उतरू शकणार नाहीत असे दिसायला लागले. आता शिवसेनेला शिर्डीतून दुसरा उमेदवार शोधावा लागणार आहे. माहितीच्या अधिकाराखाली काम करणार्‍या ज्या  कार्यकर्त्याने घोलप यांच्या मालमत्तेचा असा पाठपुरावा केला त्या कार्यकर्त्याचे अभिनंदनच केले पाहिजे. त्यांनी यासाठी तीन वर्षे संघर्ष केला आहे. या पुढच्या काळात हे काम सोपे झाले आहे. तीन वर्षे संघर्ष करण्याची गरज राहिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालात राजकीय कार्यकर्त्यांवरील भ्रष्टाचाराचे खटले एका वर्षाच्या आत निकाली काढले जावेत अशी सूचना कनिष्ठ न्यायालयांना दिली गेली आहे. एकंदरीत आता असे अनेक बबनराव घोलप उघड्यावर येणार आहेत. दरम्यान सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही बबनराव घोलप यांचा पिच्छा पुरवला होताच. त्यांनी आता घोलपांना शिक्षा झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. अण्णांनी १९९५ सालपासून शिवसेना प्रमुखांकडे घोलपांच्या विरुध्द तक्रारी केल्या होत्या.

आताही उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यांच्याशी बबनराव घोलप यांच्याबाबतीत चर्चा केली होती. घोलपांना शिक्षा होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना लोकसभेचे तिकिट देऊ नये असे अण्णांनी उध्दव ठाकरे यांना सांगितले होते. परंतु तरीसुध्दा उध्दव ठाकरेंनी घोलपांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी लंगोट बांधून तयार राहण्याचे आदेश दिले. आता साराच सरंजाम वाया गेला. अण्णा हजारे यांनी पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि बबनराव घोलप या तिघांच्या विरोधात मोहीम काढली होती. त्यातले घोलप आता सापडले. पद्मसिंह पाटील हे तर खुनाच्या आरोपात सापडले. त्यांनी अण्णांच्याही खुनाची सुपारी दिली होती असे आढळले. या सार्‍या गोष्टी अण्णांनी शरद पवार यांना सांगितल्या होत्या होत्या पण पवारांनी पद्मसिंह पाटलांना संरक्षण दिले. आता मात्र पद्मसिंह पाटील कोणत्याही क्षणी गजाआड जाऊ शकतात. सुरेश जैन तर गेल्या दीड वर्षापासून कारावासात आहेत. त्यांनी तर अण्णांवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांच्याविरुद्ध उपोषण करण्याचे नाटक केले होते. आता विकलांग होऊन तुरुंगात पडले आहेत. पूर्वी केलेल्या दृष्कृत्याची फळे कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भोगावीच लागतात हे काही खोटे नाही.