तरतरीतपणासाठी अंडी

ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांना सकाळी उठल्याबरोबर जाणवणारा जडपणा आणि मरगळ हटवायचे असेल त्यांनी सकाळी उठल्याबरोबर दोन अंडी खावीत, असा सल्ला लंडनमधल्या काही डॉक्टरांनी दिला आहे. अंड्यामध्ये असे काही अन्न घटक आहेत की, जे अन्न घटक नंतर दिवसभराच्या खाण्यातून निर्माण होणार्‍या उष्मांकाचे ज्वलन करतात आणि त्या उष्मांकाचे शरीरावर होणारे परिणाम कमी करतात. अनेक रुग्णांच्या निरीक्षणातून या तज्ज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. आपण न्याहरीसाठी जे अन्य खाद्यपदार्थ खातो त्या पदार्थांपेक्षा अंड्यांमध्ये माणसाला तरतरीत ठेवण्यास कारणीभूत असणारे काही अन्नघटक असतात. अंड्यामध्ये अशी काही प्रथिने आहेत की जी माणसाची भूक थोडीशी कमी करतात आणि आपोआपच खाणे थोडे मर्यादित होते आणि खाणे मर्यादित झाले की, तरतरीतपणाही येतो आणि वजनही कमी होण्यास मदत होते. डॉ. कॅरी रग्स्टन यांनी अंड्यांच्या या परिणामांचा विविध सहा प्रकारांनी अभ्यास केलेला आहे. 

शारीरिक ऊर्जा आणि आहार यांचा संबंध कसा आणि किती असतो या निमित्ताने हा अभ्यास करण्यात आला होता. त्यातल्या एका अभ्यासामध्ये असे आढळून आले की, अंडी खाणार्‍याच्या शरीरामध्ये भूक वाढवणारे हार्मोन्स कमी स्रवायला लागतात. म्हणजे रोज न्याहरीला दोन अंडी खाणार्‍या व्यक्तीला अन्य पदार्थ खाणार्‍या व्यक्तीपेक्षा कमी भूक लागते आणि त्याचे पुढचे परिणाम त्याला जाणवतात. अंड्यामध्ये ड जीवनसत्व जास्त असते. त्यामुळे सर्वसाधारण प्रकृती सुधारण्यास सुद्धा मदत होऊन मधुमेह तसेच हृदय विकार यापासून बचाव होतो. गेल्या २५-३० वर्षांमध्ये माणूस ङ्गार बदलून गेला आहे. त्याचे राहणीमान वाढले आहे. त्याचा आहार बदलला आहे आणि त्यानुसार त्याच्या शरीर प्रकृतीत सुद्धा अनेक बदल झालेले आहेत. 

असेच बदल अंड्यात सुद्धा झालेले आहेत. तीस वर्षांमध्ये अंड्यामध्ये अनेक बदल होऊन ते अधिक निरोगी आणि कमी अपायकारक झाले आहे. कोंबडीला जे खाद्य दिले जाते त्या खाद्यात गेल्या तीस वर्षात जे बदल झाले त्या बदलामुळे अंड्याचे स्वरूप बदललेले आहे. अंड्यातले कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी झाले आहे आणि त्याच्या मधील स्टॅक्चरल ङ्गॅटस्चे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी कोंबड्यांना गहू, मका, वनस्पतींचे तेल आणि मासळीयुक्त खाद्य अधिक खाऊ घातले जात होते. मात्र आता त्यांच्या खाद्यामध्ये शाकाहारी पदार्थ जास्त असून त्यांना मांस आणि हाडांचा चुरा यांचा पुरवठा केला जात नाही. परिणामी कोंबडीच्या अंड्यातील चरबीचे प्रमाण १९८० सालच्या अंड्यापेक्षा २५ टक्क्यांनी घटलेले आहे. ब्रिटीश सरकारच्या आरोग्य खात्याने अंड्यातल्या या बदलाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment