आईसलॅन्ड – ज्वालामुखींचे घर

जगातील सर्वाधिक ज्वालामुखी असलेला देश म्हणून आईसलॅन्ड ओळखला जातो. या देशाला ज्वालामुखींचे घर असेच म्हटले जाते. येथे १३० पेक्षा अधिक ज्वालामुखी पर्वत आहेत आणि त्यातील बहुतेक ज्वालामुखी जागृत आहेत.

आईसलॅन्डने ज्वालामुखींचा उपयोग पर्यटन वाढविण्यासाठी अतिशय कल्पकतेने करून घेतला आहे. येथील ट्रीनुकागिगुरची राजधानी रॅकजाविक शहरापासून २० किमीवर असलेला ज्वालामुखी सर्वात खोल असून हे विवर पाहण्यासाठी पर्यटकांना लिफ्टमधून खाली नेले जाते. हे विवर अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उंचीइतके खोल आहे. येथपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना पायीही बरेच अंतर चालावे लागते मात्र तरीही येथे पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात.

ज्वालामुखी विवरतज्ञ डॉ. अर्नी स्टेफेंसन यांनी या विवराचा शोध चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७४ साली लावला. २०१२ मध्ये ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.अटलांटिक समुद्राला लागून असलेल्या मिड अटलांटिक पर्वतश्रृंखलेत हा ज्वालामुखी आहे. असे सांगतात की प्राचीन काळी आईसलँड हे देव आणि दानवांचे युद्धक्षेत्र होते. येंथे देव दानवांत अनेक युद्धे झाली. त्यातून ज्वालामुखी तयार झाले. ज्वालामुखीचे तोंड म्हणजे नरकाचे द्वार अशी येथे कल्पना होती. मात्र आता याच नरकाच्या द्वारांतून आत खोलवर जाऊन पर्यटक जिवंत ज्वालामुखीचा थरार अनुभवू शकतात.

Leave a Comment