रोबोने लिहिलेली बातमी छापण्याचा प्रथम मान द लॉस एंजेलिस टाइम्सने मिळविला आहे. रोबोने लिहिलेली भूकंपाची बातमी या वर्तमानपत्राने छापली आहे. पत्रकार व प्रोग्रॅमर केन श्लेन्के यांनी हा प्रोग्रॅम विकसित केला आहे. त्यानुसार भूकंप होताच भूकंपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर हा रोबो पत्रकार त्वरीत लेख लिहू शकणार आहे. भूकंप होताच तिसरया मिनिटाला हा लेख तयार झालेला असेल व त्वरीत तो प्रकाशितही होईल असे त्यांचे म्हणणे आहे.
जगात रोबो जर्नालिझम वेगाने वाढत चालले आहे.लॉस एंजेलिस टाईम्समध्येही ते सुरू झाले आहे. भूकंप बातमीसाठी जिऑलॉजिकल सर्व्हेकडून खात्रीलायक डेटा घेतला जातो असेही समजते. भूकंपाबरोबरच शहरातील गुन्हेगारीच्या बातम्याही रोबो त्वरीत देऊ शकतो व मानवी संपादक त्या बातम्यातून महत्त्वाची कोणती याचा निर्णय घेतो असे केन यांचे म्हणणे आहे. अनेक मिडीया हाऊस रोबो जर्नालिझमचा उपयोग करू लागली असली तरी खर्या पत्रकाराची जागा रोबो कधीच घेऊ शकणार नाही असेही केन यांचे म्हणणे आहे.
केन सांगतात की रोबो पत्रकार उपलब्ध डेटावरूनच एकत्र करून बातमी तयार करू शकतो त्यामुळे त्याचा सहाय्यक म्हणून जादा उपयोग आहे. या रोबो पत्रकारामुळे कोणत्याही पत्रकाराच्या नोकरीवर गदा येणार नाही तर तो पत्रकारांना नोकरी अधिक आनंददायी बनविण्यासच मदत करेल.