गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यातील ४७ गावातल्या गावकर्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या बहिष्कारामागे या गावांच्या प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधणे हाही एक हेतू आहे. ही सर्व गावे आदिवासीबहुल आहेत.
या ४७ गावातील गावकर्यांची एक बैठक राष्ट्रीय जनहितवादी युवा समिती या संघटनेने बोलावली होती. तिच्यात हा निर्णय घेण्यात आला आणि तो पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. आपल्या मागण्या, त्याची पार्श्वभूमी आणि आपला बहिष्काराचा निर्णय यांची माहिती देणारे एक निवेदन गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांनाही सादर करण्यात आले आहे.
या आदिवासी जनतेच्या अगदी सामान्य वाटणार्या मागण्यांची पन्नास वर्षांपासून पूर्तता झालेली नाही. लेखी निवेदने, आंदोलन या सर्व मार्गांनी प्रयत्न केले पण सरकारने त्या प्रश्नांची उपेक्षाच केली. शेवटी राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीचा संस्थापक सुरेश बरसागडे याने गावकर्यांची बैठक बोलावली आणि हा निर्णय घेतला.
या संघटनेने गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यांचा स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा अशी मागणी लावून धरलेली आहे. त्याचबरोबर सरकारने आदिवासींसाठी जाहीर केलेल्या योजनांचा लाभ या जनतेला मिळत नाही, तो मिळावा अशीही त्यांची मागणी आहे.