मोदींना कोण हरवणार?

भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची वाराणसीतली उमेदवारी हा कॉंग्रेससाठी चिंतेचा विषय झाला आहे. खरे म्हणजे वाराणसीतल्या या उमेदवारीचा प्रभाव ज्या भागात जाणवणार आहे. त्या भागात कॉंग्रेसचा प्रभाव राहिलेला नाही. परंतु आम्ही नरेंद्र मोदींना पराभूत करणार अशा वल्गना करून आपले शौर्य दाखवण्याचा  कॉंग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न जारी आहे. म्हणूनच मोदींची उमेदवारी जाहीर होताच कॉंगे्रस पक्षाने एक प्रतिघोषणा केली होती. कॉंगे्रस पक्ष मोदींच्या विरोधात असा तगडा उमेदवार देईल की मोदी यांना पळता भुई थोडी होईल. कॉंग्रेसच्या या वल्गनेमुळे कॉंग्रेसकडे असा कोणता हिरा आहे असा प्रश्‍न सर्वांनाच पडला आणि मोदींना पळता भुई थोडी करण्याची ताकद जर कॉंग्रेसमध्ये असेल तर गेल्या २५ वर्षापासून कॉंग्रेसला गुजरातमधली सत्ता भाजपाकडून हिसकावून का घेता येत नाही अशी जिज्ञासा निर्माण झाली. कॉंग्रेसच्या नेत्यांनी वल्गना काहीही केली  तरी वस्तुस्थिती अशी आहे की मोदींच्या विरोधातला उमेदवार शोधताना त्यांनाच पळता भुई थोडी व्हायला लागली आहे. मोदींच्या विरोधातल्या सगळ्या पक्षांच्या मतांची बेरीज करून मोदींना निवडणुकीत पराभूत करावे यासाठीही कॉंग्रेसचे नेते प्रयत्न करायला लागले आहेत. 

खरे म्हणजे कॉंग्रेसमधला सर्वात बलवान उमेदवार राहुल गांधी हे आहेत. सोनिया गांधीसुध्दा आहेत. तेव्हा आता मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल किंवा सोनिया गांधी यांच्यापैकी कोणीतरी उभे रहायला हवे होते. नरेंद्र मोदी जसे गुजरातमधून उत्तर प्रदेशात येऊन उभे रहात आहेत. तसे सोनिया गांधी यांना त्यांचा रायबरेली मतदारसंघ सोडून त्याच राज्यातला वाराणसी मतदारसंघ लढवायला काही हरकत नाही. राहुल गांधीसुध्दा तसे करू शकतात. मात्र त्या ऐवजी राहुल आणि सोनिया गांधी मोदीसमोर कापण्यासाठी मोठा बकरा शोधायला लागले आहेत. मोदींच्या विरोधात चित्रपट अभिनेता उभा करायचा म्हटल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांना शाहरूख खानचा पर्याय विचारात घ्यावा लागतो. शाहरूख खानचे व्यक्तीमत्त्व विचारात घेतले तर त्याचा विचार करणे हेसुध्दा गांधी-नेहरूंच्या कॉंग्रेसचे कसे अधःपतन आहे हे लक्षात येते. कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदीविरोधी उमेदवार म्हणून सचिन तेंडुलकरलाही गळ घातली असल्याचे कळले आहे. मात्र सचिन तेंडुलकर बकरा व्हायला तयार नाही. मोदींच्या विरोधात वाराणसीमध्ये एक तगडा उमेदवार उभा करण्यामागे कॉंग्रेसचे काही डावपेच आहेत. मोदीना वाराणसीमध्ये अडकवून ठेवणे हा त्यांचा हेतू आहे. कारण मोदींच्या सभा हीच कॉंग्रेसची खरी डोकेदुखी झालेली आहे. 

मोदी वाराणसीत तगड्या उमेदवाराच्या विरोधात अडकले की त्यांच्या सभा कमी होतील आणि त्यांचा झंझावात वाराणसीतच अडकून पडेल. परिणामी आपली डोकेदुखी कमी होईल असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटते. मोदी वाराणसीत अडकतील की नाही हे माहीत नाही. परंतु मोदींच्या विरोधात उमेदवार शोधताना कॉंग्रेसचे नेतेच अडकून पडले आहेत. त्यांना उमेदवार सापडत नाही आणि सापडला तरी तो मोदींच्या विरोधात उभा राहायला तयार होत नाही. अशावेळी जोकर दिग्विजयसिंग हे एका पायावर तयार असतात. तेव्हा त्यांनी स्वतःच मोदींच्या विरोधात उभे राहण्याची तयारी दाखवली आहे. ते खूप तयार होतील पण मोदींशी टक्कर देऊ शकतील की नाही या विषयी कॉंग्रेसच्याच नेत्यांना शंका वाटत आहेत आणि त्या साहजिक आहेत. २००३ पूर्वीची दहा वर्षे दिग्विजयसिंग मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री होते. मात्र भारतीय जनता पार्टीने त्यांची सत्ता हिरावून घेतली. तेव्हापासून १५ वर्षे दिग्विजयसिंग मध्य प्रदेशात भाजपाच्या प्रभावाला धक्का लावू शकलेले नाहीत. जे स्वतःच्या राज्यात भाजपाचा प्रभाव हटवू शकत नाहीत ते वाराणसीत जाऊन भाजपाच्या प्रभावाला धक्का लावतील हे अजिबात संभवत नाही. मात्र ते अधूनमधून वाराणसीला जात असतात. एवढ्या एका आधारावर ते मोदींशी टक्कर देतील असा समज काही कॉंग्रेस नेत्यांनी करून घेतला आहे. 

दुसर्‍या बाजूला अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहायला तयार झाले आहेत. जिथे फुकटची प्रसिध्दी मिळते तिथे केजरीवाल पळत जातात. वाराणसीत मोदींच्या विरुध्द उभे राहण्याच्या त्यांच्या पवित्र्यामागे यापेक्षा दुसरा कोणताही हेतू नाही. काही वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी केजरीवाल तेथे पराभूत होतील हे गृहितच धरून चर्चा सुरू केली आहे. परंतु सगळ्या पक्षांनी मिळून केजरीवाल यांना आपला उमेदवार करावा अशी सूचनाही काही समाजवाद्यांनी मांडली आहे. ज्यांना केजरीवाल हे काय प्रकरण आहे हे माहीत नाही तेच अशी सूचना करू शकतात. मात्र २००९ च्या लोकसभा निवडणुकीत या वाराणसीमधून मुरली मनोहर जोशी निवडून आले तेव्हा  विविध पक्षांच्या उमेदवारांना जी मते पडली होती ती सारी मते समोर ठेवून काही पत्रकार बाळबोध गणित मांडत आहेत. मुरली मनोहर जोशी यांना दोन लाख मते पडली होती आणि बाकी सर्व उमेदवारांना मिळून ५ लाख मते पडली होती. आता या सगळ्या पक्षांनी मोदींच्या विरोधात एकच उमेदवार दिला तर मोदींना दोन लाख मते पडतील आणि त्यांच्या विरोधातल्या संयुक्त उमेदवाराला पाच लाख मते पडतील असे बाळबोध गणित हे पत्रकार मांडायला लागले आहेत. जोशींच्या विरोधातले सगळे उमेदवार जर एवढे शहाणे असतील तर ते त्याच वेळी एकत्र का आले नाहीत असा प्रश्‍न आहे.

Leave a Comment