नागपूर मतदारसंघात गडकरींमुळे चुरस

महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये नागपूरची निवडणूक हीसुध्दा लक्षणीय ठरणार आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी या मतदार संघात उभे आहेत. नितीन गडकरी हे यापूर्वी विधानपरिषदेवर  पदवीधर मतदारसंघातून अनेकदा निवडून आलेले आहेत. ते पहिल्यांदाच थेट निवडणुकीला उभे रहात आहेत. त्यांची ही पहिली वेळ असली तरी त्यांना अशा निवडणुकीचा अनुभव नाही असे म्हणता येत नाही. त्यांनी विधानसभा आणि लोकसभेच्या अनेक निवडणुकांची रणनिती आखून विजय मिळवून दाखवलेला आहे. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातल्या ११ लोकसभा मतदारसंघांपैकी दहा मतदारसंघात त्यांनी भाजपा-सेना युतीचे उमेदवार निवडून आणले होते. ते भाजपाचे राष्ट्रीय नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीने नागपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक लक्षणीय ठरली आहे. 

त्यांच्या विरोधात या मतदारसंघात कॉंग्रेसचे विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार हे उभे आहेत. मुत्तेमवार यांनी मागच्या निवडणुकीत ही जागा निसटत्या बहुमताने जिंकली होती. ते निवडून आलेले असले तरी त्यांचे केवळ २५ हजार मतांनी निवडून येणे हे फार कौतुकाचे ठरले नव्हते. ते २५ हजाराचे अंतर गडकरी काटतील असे लोकांना वाटते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत मुत्तेमवार यांच्या विरोधात बनवारीलाल पुरोहीत उभे होते. ते मुळातले कॉंग्रेसचे पण भाजपात येऊन उभे राहिले आणि त्यांना मुत्तेमवार यांना चांगली टक्कर दिली. यावेळी मुत्तेमवार यांची लढत गडकरी यांच्याशी होत आहे आणि गडकरींचा एक ठरलेला मतदार या मतदारसंघात आहे. 

नागपूर मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघांचा बनलेला आहे. त्यातल्या चार मतदारसंघात आता कॉंग्रेसचे आमदार आहेत आणि दोन मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. परंतु हे सगळे मतदारसंघ शहरातले आहेत आणि नागपूरची महापालिका मात्र भाजपाच्या ताब्यात आहे. त्याचा फायदा गडकरी यांना मिळेल अशी आशा आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया या उभ्या आहेत आणि बहुजन समाज पार्टीचे मोहन गायकवाड  हे लढत देत आहेत. या दोन उमेदवारांचा मुत्तेमवार आणि गडकरी यांच्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या दोघांचा प्रभाव काय राहतो यावर गडकरी आणि मुत्तेमवार यांचे निवडून येणे अवलंबून आहे. 

बसपाचे मोहन गायकवाड हे नगरसेवक आहेत आणि त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात बसपाच्या उमेदवाराने १ लाख १८ हजार मते घेतली होती. या मतांचा परिणाम कॉंग्रेसवर होत असतो.  १९९६ पासून या मतदारसंघातली बसपाची मते वरचेवर वाढत आहेत. यावेळी त्यांना सव्वा लाखापेक्षाही अधिक मते मिळतील आणि तेवढा कॉंग्रेसच्या मतावर परिणाम होईल. म्हणून भाजपाचे कार्यकर्ते बसपाला किती मते मिळतील याला महत्त्व देत आहेत. 

आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया या भाजपाला डोकेदुखी करणार्‍या आहेत. त्या काही नागपूरच्या नाहीत. परंतु त्यांनी आपल्या तथाकथित भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेत नितीन गडकरी यांना सातत्याने  लक्ष्य केले. म्हणून त्यांना गडकरींच्या विरुध्द उभे केले आहे. आम आदमी पार्टी सुशिक्षित शहरी मतदारांची मते मिळवेल असा अंदाज आहे.  परंतु अंजली दमानिया गडकरींच्या मतदारांमध्ये फार मोठी फट पाडतील असे भाजपाच्या नेत्यांना वाटत नाही. त्यामागची दोन कारणे आहेत. मुळात अंजली दमानिया या वावदूकपणा करत आहेत अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहेत. त्या नागपूरच्या राहणार्‍या नाहीत. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बंड केले. काहींनी पक्ष सोडून दिला आणि नागपूर आम आदमी पार्टी असा पक्ष स्थापन केला. त्यामुळे आम आदमी पार्टीचे आव्हान फार जाणवणारे नाही. गडकरी यांच्यादृष्टीने ही गोष्ट अनुकूल आहे. 

नितीन गडकरी यांना शिवसेना हा घटक तापदायक ठरेल  अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. कारण गडकरी यांनी  मनसेशी चर्चा करून शिवसेनेला दुखावलेले आहे. शिवसेनेचे नेते गडकरींच्या विरोधात डमी अपक्ष उमेदवार उभा करण्याच्या विचारात आहेत. अशी चर्चा होती पण उध्दव ठाकरे यांनी ही गोष्ट नाकारली आहे. नागपूरचे शिवसैनिक गडकरींचाच प्रचार करतील असे त्यांनी जाहीर केले आहे. काही शिवसैनिक काही गडबड करतील तर शेजारच्या रामटेक मतदारसंघात भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेचा प्रचार करणार नाहीत. असे होऊ नये म्हणून नागपूरच्या शिवसैनिकांनी गडकरींचाच प्रचार केला पाहिजे हे शिवसैनिकांच्या लक्षात आले आहे. एकंदरीत वातावरण गडकरी यांना अनुकूल आहे.

Leave a Comment