मास्को – रशियात सामील करून घेतल्यानंतर क्रिमियाला जाणे येणे सहज सुलभ व्हावे यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी या दोन्ही बाजूंना जोडणारे रेल्वे आणि वाहन पूल बांधण्याचे आदेश दिले आहेत. रशियाच्या मंत्रीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.
पुतीन म्हणाले की या दोन प्रांतांना जोडण्यासाठी पूल बांधायचा प्रकल्प दीर्घ काळ विचाराधीन होता त्याला आता गती दिली जात आहे. या पुलांमुळे रशिया आणि क्रिमियातील नागरिक तसेच मालवाहतूक सुरळीत होऊ शकणार आहे. रशियातून थेट क्रिमियात जाणेयेणे त्यामुळे सुलभ होणार असून सध्या क्रिमियाला जाण्यासाठी मेन लँड युक्रेन मधूनच जावे लागते. सध्या रशिया आणि क्रिमिया यांच्या दरम्यान फेरी बोटीतून वाहतून केली जाते व हा मार्ग केवळ साडेचार किलोमीटरचा आहे. पूल झाल्यानंतर हे अंतर अधिक वेगाने कापले जाऊ शकणार आहे.