कोणते महाराज यशस्वी होणार? सेनेचे की मनसेचे?

मुंबई – महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज याच्यापासून प्रेरणा घेऊन मराठी माणसासाठी स्थापन करण्यात आलेली शिवसेना आणि शिवसेनेतून बाहेर पडून मराठी माणसाचे हित जपण्यासाठी स्थापन झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांपैकी कुणासाठी शिवाजी महाराजांची पुण्याई लाभदायक ठरणार अशी चर्चा सध्या राजधानी मुंबईत जोरात सुरू आहे. कारण? या दोन्ही पक्षांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या दोन कलाकारांना आपल्या पक्षात स्थान दिले आहे. हे कलाकार आहेत अमोल कोल्हे आणि महेश मांजरेकर.

अमोल कोल्हे यांनी कालच शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी लगोलग त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे जाहीरही करून टाकले आहे. अर्थात लोकसभेसाठी सेनेचे सर्व उमेदवार जाहीर झाल्यामुळे कोल्हे यांना विधानसभेत उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते. मात्र त्यांना शिवाजी महाराजांची भूमिका केल्यामुळे मिळालेली लोकप्रियता कॅश करण्यासाठी विविध रॅलीज, सभांमधून सहभागी केले जाणार आहे. कोल्हे शिवसेनेसाठी मते मागताना दिसतील.

कोल्हे यांनी शिरूर च्या जागेसाठी मनसेकडून विचारणा झाल्याचे सांगतानात मनसेच्या नेतृत्त्वाचा वि्श्वास वाटत नसल्याने सेनेत येणे पसंत केल्याची यापूर्वीच सांगितले आहे. कोल्हे यांनी टिव्हीवर सादर झालेल्या शिवाजी महाराज मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

दुसरीकडे महेश मांजरेकर यांना मनसेने उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. मांजरेकर यांनी मी शिवाजीराजे बोलतोय या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती आणि त्यातील शिवाजी राजांची भूमिकाही सादर केली होती. या चित्रपटाने महाराष्ट्रात अनेक पुरस्कार पटकावलेच पण प्रेक्षकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला होता. मनसेकडे मतदार आकृष्ट होण्यास मांजरेकरांची शिवाजी महाराजांची भूमिका चांगलीच उपयोगी ठरेल असे मनसे नेत्यांना वाटते आहे.

मांजेरकर यांना निवडणुकीत काँग्रेसचे पाच वेळा निवडून आलेले खासदार गुरूदास कामत, आम आदमीचे मयंक गांधी तर शिवसेनेचे गजानन कीर्तीकर यांच्याशी मुकाबला करावा लागणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि मनसे योन्ही पक्षांना चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार पक्षात असण्याची गरज भासत होती आणि योगायागाने दोन्ही पक्षांना शिवाजी महाराजच मिळाले आहेत.

Leave a Comment