पुणे- राज्यातील भारतीय जनता पक्षामध्ये देान गट आहेत. एक गट खासदार गोपीनाथ मुंडे यांचा तर दुसरा गट नितीन गडकरी यांचा आहे; या गटातटाच्या राजकारणतच पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी लटकली आहे. मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून समर्थकांसाठी हट्ट धरून बसलेल्या पुणे आणि लातूर या दोन मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करण्यामध्ये भाजपला अपयश आले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जागांसाठी भाजपअंतर्गत रेस आहे. गोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी आणि त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने आव्हान दिले जात आहे. यंदा हा विरोध टोकाला गेला आहे. पूनम महाजन, प्रताप ढाकणे, अनिल शिरोळे, रावसाहेब दानवे या आपल्या चार समर्थकांना कोणत्याही स्थितीत उमेदवारी मिळाली पाहिजे, असा हट्ट मुंडे यांनी धरला होता.
भाजपच्या पहिल्या यादीत फक्त दानवे यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात आली. पूनम महाजन आणि ढाकणे यांच्या मतदारसंघांतून अनुक्रमे किरीट सोमय्या आणि दिलीप गांधी यांची नावे जाहीर केली गेली. मुंडे यांना तो धक्का होता. त्यानंतर मुंडे यांनी पुणे आणि लातूर या मतदारसंघांबाबत कमालीचे आग्रही झाले. लातूर मतदारसंघ आपल्या बीड मतदारसंघाच्या शेजारी असल्याने तेथे आपल्याच पसंतीचा उमेदवार पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. त्या मुळे लातूर व पुणेमधील तिढा सुटलेला नाही.