देवपूजा, हवन, यज्ञांना आलं उधाण

दिल्ली – निवडणुकांच्या तारखा आणि उमेदवार्‍या जाहीर झाल्यानंतर देशभरात विविध मंदिरांतून, घराघरातून आणि सार्वजनिक स्वरूपातही यज्ञ, याग, पूजा,हवन सुरू झाली असून राजकीय नेते, उमेदवार, त्यांचे समर्थक आणि कुटुंबिय देवांना आपल्याबाजूने कौल द्यावा यासाठी गार्हाघणी घालू लागल्याचे चित्र दिसत आहे. आता यातील कुणाचे पूजा पाठ आणि नवस देवाने मान्य केले हे निवडणुकांच्या निकालानंतरच कळणार आहे.

पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे बंधू सोम यांनी मध्यप्रदेशातील बाघलामुखी मंदिराला नुकतीच भेट दिली असल्याचे समजते. अर्थात त्यांनी ही भेट वैयक्तीक कारणासाठी असल्याचे सांगितले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी झालवारा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दुष्यंतसिंग यांच्यासह मंदिर भेटी दिल्या आहेत. भाजपवर धर्मांध म्हणून टीका करणार्‍या काँग्रेसनेही मथुरा, तिरूपती, उजैन, गुरूवायूर व अन्य कांही मंदिरातून चोवीस तास यज्ञ याग चालविले आहेत. यामुळे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढण्यास मदत होईल असा विश्वास कांही नेते व्यक्त करत आहेत.

असल्या अंधविश्वासांची नेहमीच खिल्ली उडविणारे राजदचे प्रमूख लालूप्रसाद यादव यांनीही त्यांच्या राहत्या घरात एक पाण्याचा हौद बांधून घेतला आहे. हे पाणी घरात पाणी नाही म्हणून वापरले जात नाही तर कोण्या ज्योतिषाने त्यांना घरात पाण्याचा हौद बांधा म्हणजे तुमचे भाग्य उजळेल असे सांगितले असल्याचे वृत्त आहे.