पुण्यात विश्वजित कदम यांच्या उदयापेक्षा कलमाडींचा अस्त अधिक महत्वाचा

पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने राज्य युवक र्कॉग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी मिळाल्याने पुण्याचे रिंगण स्पष्ट होवू लागले आहे. ही घटना राजकारणातील खांदेपालट म्हणून महत्वाची आहे. त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रात दहा वर्षापेक्षा अधिक काळ मंत्री असलेले पतंगराव कदम आहेत पण एवढ्याने त्यांच्या पाठिशी उभ्या असणार्‍या शक्तीशी कल्पना येणार नाही. पतंगराव हे गेली 45 वर्षे यशस्वी राजकारणात आहेत. राजकीय कारकीर्दीयेवढीच पतंगराव यांची शक्ती म्हणजे भारतीविद्यापीठ. पुण्यात तर त्याचा विस्तार जवळ जवळ पुणे विद्यापीठायेवढा आहे. पण त्याही पेक्षा अधिक म्हणजे महाराष्ट्रात चाळीसपेक्षा अधिक ठिकाणी भारतीविद्यापीठाच्या एक ते दहा महाविद्यालयांचे संकूल असलेली केंद्रे आहेत. पुढच्या पिढीला तयार करण्याचा भाग म्हणून गेली पाच, सहा वर्षे पतंगराव यांच्या पुढाकाराने विश्वजितकडे प्रदेश युवककाँग्रेसचे अध्यक्षपद आले आहे. महाराष्ट्रात मंत्री असून आपल्या मुलाला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा प्रकार नारायण राणे यांनी केला आहे. आता हे दुसरे उदाहरण घडत आहे. पुण्यात विद्यमान खासदार सुरेश कलमाडी हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दहा महिने तिहारजेलमध्ये राहून आल्याने त्याच पक्षाची उमेद्वारी मिळालेल्या विश्वजीत कदम यांना किती यश मिळेल, हे सांगणे कठीण आहे. लोकसभेच्या रिंगणात निवडून यायचे असेल तर काहीवेळा पराभूत होणे हाही अभ्यासाचा व सरावाचाच भाग  मानला जात असल्याने त्यांचे लढणे हे त्यांना उपयोगीच वाटण्याची शक्यता आहे. 

तरीही पुण्यातील उमेद्वारात बदल ही मोठी घटना आहे. कारण अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत कलमाडी हे ही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. आपल्याला मिळत नसेल तर मीराबाई कलमाडी यांना ती मिळावी, असाही त्यांचा प्रयत्न झाला पण त्याचा उपयोग झाला नाही. या उमेदवारीवर कलमाडी यांची प्रतिक्रिया काय हे कळायला थोडा अवधी द्यावा लागेल. कलमाडी पुढील महिन्यात त्यांच्या वयाची 70 वर्षे पूर्ण करीत आहेत. राजकारणात कधी निवृत्ती नसते तरीही 70 हे वय मोठे उद्योग कमी करण्याचे आहे पण कलमाडी ही निवृत्ती सन्मानाने मिळालेली नाही. तर ते गुन्हेगार असल्याचे त्यांच्या पक्षानेच जाहीर केले आहे. कलामाडी यांच्या ऐवजी विश्वजित कदम यांचे नाव पुढे आले तरी लोकसभेचे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही कारण अजून भाजपाचा उमेदवार स्पष्ट झालेला नाही. तोही एक दोन दिवसात स्पष्ट होईलच. पण पुण्यात कलमाडी यांचा 32 वर्षाचा संसदीय कालखंड दुर्दैवी कारणाने संपून त्याना अज्ञातवासाचा स्वीकार करावा लागणे ही तेवढीच महत्वाची घटना आहे. गेल्या चाळीस वर्षात पुण्यात प्रचंड शोमनशिप केलेल्या कलमाडींना एक पाउल तिहार जेलमध्ये तर दुसरे पाउल अज्ञातवासात अशा स्थितीत पायउतार व्हावे लागले.त्यांची कॉमन वेल्थ गेमची घटना घडल्यावर  ‘ओ तरी’ नावाचा चित्रपटही निघाला होता. 

पुण्याचा गेल्या पंचेचाळीस वर्षाचा संसदीय निवडणुकांचा इतिहासही असाच वादळी आहे. धारियांचे आणिबाणिविरोधातील आंदोलन, विठ्ठलराव गाडगिळांना स्वीकारावी लागलेली राजीव गांधींची खप्पा मर्जी आणि कलमाडी यांचे एकदा पक्षत्याग आणि नंतर काँग्रेसमध्ये जावूनही तिहारमार्गे अज्ञातवासात जाणे हे सारे अद्भूत आहे.  गेल्या चाळीस वर्षाच्या संसदीय प्रतिनिधीत्व करणारात पहिली दहा वर्षे मोहन धारिया यांची होती. नंतरची दहा वर्षे विठ्ठलराव गाडगिळांची होती. आणि नंतरच्या काळात बारा वर्षे कलमाडी यांना मिळाली. अर्थात येवढ्याने या तीनही मंडळींच्या संसदीय कामाचा आलेख स्पष्ट होणार नाही. या तीनही खासदारांना लोकसभेचे लोकांच्यामधून निवडून येण्याचे खासदारपद मिळण्यापूर्वी कोणाला एकदा तर कोणाला दोनदा तर कोणाला तीनदा खासदारपद मिळाले होते. कलमाडी यांना एकूण एकतीस वर्षे खासदारपद मिळाले त्यामानाने धारिया यांना फक्त 12 वर्षे मिळाले तरीही भारतीय संसदेच्या इतिहासात धारियांचे नाव आदराने घेतले जाईल कारण जेंव्हा इंदिरा गांधी हुकुमशाहीच्या दिशेने निघाल्या होत्या तेंव्हा त्याविरोधात बंड पुकारायला मोठी हिंमत लागते. ती धारिया यांच्याकडे होती. अशीच त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. 

सध्या राजकारणात कधीही नव्हे अशा अत्यंत वेगाने घटना घडत आहेत. पक्षांतरे हा येथील स्वभाव झाला आहे. सध्या तरी रिंंगणात भाजपा काँग्रेस आणि काही प्रमाणात आप अशी स्थिती दिसते आहे. सर्व ठिकाणचे उमेदवार स्पष्ट झाल्यावरच जरी चित्र स्पष्ट होणार असले तरी सार्‍या वातावरणाला अस्थिरतेचा शाप आहे की काय असे वाटू लागले आहे. त्यामुळे कोण निवडून येईल किंवा कोण सत्तेवर येईल यापेक्षाही भारतीय लोकशाहीला गेली साठ वर्षे जी स्थिरता मिळाली होती तीच विस्कटेल की काय असे वाटू लागले आहे.

Leave a Comment