झी मीडियाने धोनीविरुद्ध पुरावे सादर केले

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने झी मीडियाविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयात अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला आहे. मात्र गेल्या मंगळवारी हा खटला दाखल होताच झी मीडियाने आपल्याकडे असलेले धोनीच्या विरोधातले सगळे पुरावे सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहेत. आपण दिलेल्या धोनीच्या संबंधातल्या बातम्या कोणत्याही एका व्यक्तीच्या बदनामीसाठी दिल्या नसून क्रिकेटच्या खेळात घुसलेल्या दुष्प्रवृत्ती निष्प्रभ व्हाव्यात यासाठी दिल्या आहेत असे झी मीडियाने म्हटले आहे.

भारतातले करोडो लोक क्रिकेटप्रेमी आहेत. परंतु क्रिकेटच्या खेळात शिरलेल्या दुष्प्रवृत्तीमुळे या खेळाला जे स्वरूप प्राप्त होत आहे त्यामुळे या क्रिकेटप्रेमींची निराशा होत आहे. तसे होऊ नये या दृष्टीने झी मीडियाने काही दृश्ये प्रक्षेपित केली. कोणत्याही व्यक्तीची बदनामी होईल अशी दृश्ये दाखवलेली नाहीत किंवा तसे कोणतेही संवाद सुद्धा ऐकवले नाहीत असे स्पष्टीकरण झी मीडियाच्या वकिलाने केले. 

झी मीडियाने प्रक्षेपित केलेले फुटेज विदू दारासिंग आणि श्री. संपतकुमार यांच्या स्टींज ऑपरेशनमधून मिळालेल्या चित्रीकरणावर आधारलेले होते, असेही मीडियाने म्हटले आहे. वादग्रस्त ठरलेले हे फुटेज २४ ते २८ फेब्रुवारीच्या दरम्यान झी मीडियावरून प्रक्षेपित केले गेले आहे. या संबंधात महेंद्रसिंग धोनी याने झी मीडियाविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयात खटला दाखल करताच झी मीडियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि हस्तक्षेपाचा अर्ज केला.

Leave a Comment