…अन् धोनीनं ठोकलं १० चेंडूंत अर्धशतक!

फतुल्लाह – टीम इंडियाचा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी रंगात आल्यावर प्रतिस्पर्ध्यांना कसा तुडवतो, हे आपण ब-याचदा पाहिलंय. पण, आज सराव सामन्याआधीच्या सरावादरम्यान धोनी पेटला आणि त्यानं अमित मिश्राच्या दहा चेंडूंवर चौकार-षटकारांची आतषबाजी करत भन्नाट अर्धशतक ठोकलं. या धुलाईनंतर, कपाळावर हात मारून घेण्याशिवाय मिश्राकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. बांगलादेशात सुरू झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना २१ तारखेला पाकिस्तानशी होणार आहे. त्याची तयारी म्हणून, टीम इंडियाचा एक सराव सामना परवा श्रीलंकेविरुद्ध झाला. त्यात धोनीसेना पराभूत झाली होती. त्यानंतर, आज हे वीर इंग्लंडशी दोन हात करून स्वतःला अजमावून पाहणार आहेत.

मात्र, हा सामना सुरू होण्याआधी टीम इंडियानं फलंदाजी, गोलंदाजीचा सराव केला. तेव्हा, महेंद्रसिंग धोनी आणि फिरकीपटू अमित मिश्रा आमनेसामने आले. त्यानंतर पुढची दहा मिनिटं फतुल्लाहच्या मैदानावर अक्षरशः वादळ घोंघावलं. धोनी मिश्राच्या गोलंदाजीवर असा काही तुटून पडला की, त्यानं सलग दहा चेंडू सीमारेषेपार भिरकावले. सहा षटकार आणि चार चौकारांची आतषबाजी करून त्यानं १० चेंडूंत ५२ धावा ठोकल्या. दुपारच्या रणरणत्या उन्हात पीचवर उभं राहणं असह्य होत असताना, ‘कॅप्टन कूल’ चांगलाच तापला होता. त्याचा हा आक्रमक पवित्रा पाहून सगळ्यांनीच बोटं तोंडात घातली. अमित मिश्राचा चेहरा साफच उतरला होता. 

‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये आपण नाही, हे त्याला कळूनच चुकलं असावं. याआधी, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं सरावादरम्यान मुरली कार्तिकच्या गोलंदाजीची अशीच वाट लावली होती. अवघ्या आठ कसोटी सामन्यात कार्तिकची कारकीर्द संपणामागे हेही एक महत्त्वाचं कारण ठरलं होतं. त्यामुळे आता अमित मिश्राच्या पुढच्या प्रवासावरही अनिश्चिततेचं सावट दिसू लागलं.

Leave a Comment