शिवसेनेचे काही नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात- पवार

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रावादीने शिवसेनेचे नेते फोडण्याची रांग लावली आहे. दोन खासदारसह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांची ताकद चांगली वाढली आहे. येत्‍या काळात शिवसेनेचे अजून काही नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असून त्यांची नावे जाहीर केली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची झोप उडेल असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. आगामी काळात शिवसेनेला आणखीन एक भगदाड पाडणार अशी वल्गना अजित पवार यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कल्याणचे सेनेचे खासदार आनंद परांजपे, परभणीचे खासदार गणेश दुधगावकर आणि त्यानंतर आता शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी शिवबंधनाचा धागा तोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर शिर्डीत सेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत फोडाफोडीच्या राजकारणाला सुरूवात झाली आहे.

राहूल नार्वेकर यांनी सेना सोडताना पक्षात घुसमट होत होती, विधान परिषदत निवडणुकीत आपल्याला शिवसेनेत कुणीच मदत केली नाही. पद नसलेले लोक पाय खेचण्याचे काम करत होते, असे म्हणत नार्वेकरांनी नाव न घेता मिलिंद नार्वेकर यांच्यावर तोफ डागली. हा सर्व प्रकार पक्ष नेतृत्वाच्या कानावर घालूनही काहीच फायदा झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात शिवसेना या फोडाफोडीला कसे उत्त‍र देणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment