रक्तात प्राणवायूचा प्रवेश

पूर्वीच्या काळी भारतामध्ये आयुर्वेदचाच वापर जास्त होत होता आणि बरेच पोचलेले अनुभवी वैद्य रुग्ण अगदी मृत्यूपंथाला लागला की, तो आता जाणार आहे हे हमखास ओळखत असत. अशावेळी त्याला काही निरवानिरवीचे बोलता यावे किंवा अंत्यविधीसाठी मुला-मुलींना बोलवता यावे म्हणून थोड्या वेळासाठी त्याला जीवनदान देत असत. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मुळी उगाळून ती रुग्णाला दिली जात असे. अशावेळी ते वैद्य स्पष्टपणे सांगतही असत की, या मुळीमुळे आता हा रुग्ण साधारण अर्धा तासच जगणार आहे आणि खरोखरच त्याला तसे अर्धा तासाचे जीवनदान दिलेले असे. तशाच प्रकारचे एक संशोधन आता ऍलीपॅथीमध्ये सुद्धा शोधण्यात आलेले आहे. त्यासाठी अमेरिकेतल्या एका डॉक्टरने रक्तातील प्राणवायू संपल्यामुळे श्‍वास मंदावत चाललेल्या म्हणजेच जवळजवळ मृत्यूपंथाला लागलेल्या रुग्णाला ऑक्सिजनचे इंजेक्शन टोचण्याची पद्धत विकसित केली आहे. तिच्यामुळे श्‍वास बंद पडत चाललेला रुग्ण काही वेळ तरी निश्‍चितपणे पुन्हा पूर्ववत श्‍वास घेऊ शकतो. 

अमेरिकेतील बोस्टन येथील बोस्टन्स् चिल्ड्रन्स हॉस्पिटल या रुग्णालयातील डॉ. जॉन खेर या डॉक्टरने हे संशोधन केलेले आहे. त्यांचा एक रुग्ण शस्त्रक्रियेच्या टेबलवर होता. परंतु शस्त्रक्रियेच्या दरम्यान त्याच्या प्रकृतीत काही दोष निर्माण झाला आणि त्या रुग्णाचा श्‍वास मंदावत चालला. डॉक्टरला हे सगळे दिसत होते. परंतु या रुग्णाला नीट श्‍वास घेता येत नव्हता आणि श्‍वास न घेतल्याने त्याच्या रक्ताला ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकत नव्हता. हे सारे कळत असूनही डॉक्टर जॉन खेर काही करू शकले नाहीत आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा रुग्ण दगावला. त्याचवेळी या डॉक्टरच्या मनामध्ये असा विचार चमकून गेला की, हा रुग्ण श्‍वास घेऊन आपल्या रक्ताला ऑक्सिजन पुरवू शकत नाही. परंतु त्याला कृत्रिमरित्या ऑक्सिजन टोचता येईल का? तसा तर अत्यवस्थ झालेल्या रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवलेले असते. 

परंतु त्या पद्धतीमध्ये पुरवला जाणारा ऑक्सिजन रुग्ण स्वत:च शोषून घेऊन आपल्या रक्ताला पुरवत असतो. परंतु एखाद्या रुग्णामध्ये तीही क्षमता नसेल तर थेट त्याच्या रक्तामध्येच ऑक्सिजन का सोडू नये असे डॉक्टर जॉन खेर यांना वाटले. त्यांनी त्यावर काही संशोधन केले. आधी अत्यवस्थ असलेल्या प्राण्यांवर प्रयोग केले असता इंजेक्शनच्या माध्यमातून त्याच्या रक्तात जेव्हा ऑक्सिजन सोडला गेला तेव्हा तो प्राणी तरतरीत झाला आणि त्याचा श्‍वास पूर्ववत होऊन तो १५ मिनिटे जगला. हाच प्रयोग जेव्हा माणसावर केला तेव्हा माणूस तर ३० मिनिटे जगला. अर्थात रक्तामध्ये असे ऑक्सिजन टोचण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि तिच्यामध्ये ऑक्सिजनचा रेणु चरबीचे आवरण घालून शरीरात सोडला जातो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment