क्वालालंपूर- बिजींगच्या दिशेने निघालेल्या मलेशिया एअरलाईन्सच्या भरकटलेल्या विमानाचे गुढ आणखी वाढत चालले आहे. विमानाच्या कॉकपीटमधून ‘ऑल राईट, गुड नाईट’ असा शेवटचा संदेश मिळाल्याने या विमानाचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानाच्या सह पायलटने विमानाच्या कॉकपीटमधून ‘ऑल राईट, गुड नाईट’ असा शेवटचा संदेश दिल्याचे मलेशिया एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद जौहारी याह्या यांनी सांगितले. यामुळे विमानाचे आत्मघातकी दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मलेशियन एअरलाइन्सचे एमएच ३७० हे २३९ प्रवासी घेऊन निघालेले विमान आठ मार्चपासून बेपत्ता झाले आहे. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.
बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी सध्या हिंदी महासागरातील दक्षिण भागात उत्तर कॅस्पियन समुद्रात २६ देशांमार्फत शोधकार्य सुरु आहे. मात्र तपास सुरु असताना विमान जाणीवपूर्वक वळवल्याचे उघडकीस येत आहे. त्यातच विमानातील संपर्कयंत्रणाही मुद्दामहून बंद करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. आता विमानाच्या सह पायलटने विमानाच्या कॉकपीटमधून रात्री एक वाजून सात मिनिटांनी ‘ऑल राईट, गुड नाईट’ असा शेवटचा संदेश देण्यात आला. त्यानंतर एक वाजून १९ मिनिटांनी संपर्क तुटल्याचे तपासात उघड झाल्यामुळे विमानाचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे विमान तालिबानी दहशतवाद्यांच्या ताब्यात असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
विमानावर ज्यांचे नियंत्रण आहे त्यांना अवकाशमार्गाची आणि तांत्रिक माहिती खूपच चांगली होती, आणि त्यापैकीच कोणीतरी विमानाचा संपर्क तोडला, हेही तपासात स्पष्ट होत आहे. त्यामुळे विमानातील कॅप्टन जहारी अहमद शहा आणि त्याचा सहकारी फारीक अब्दुल हमीद संशयाच्या भोव-यात असल्याचे याह्या यांनी सांगितले. दरम्यान, मलेशियन पोलीस आता या विमानातील वैमानिकाची पार्श्वभूमी, केबिन क्रू कोण कोण होते, त्यांची पार्श्वभूमी, अन्य कर्मचा-यांचीही कसून चौकशी करत आहेत. पायलट किंवा सह पायलट यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला होता का, याचीही चौकशी सुरु असल्याचे मलेशियाचे कार्यकारी वाहतूक मंत्री हिशाम्मुद्दीन हुसैन यांनी सांगितले.