बेपत्ता विमानाचा तालिबानी भागातून प्रवास?

क्वालालंपूर- दहा दिवसांपूर्वी बेपत्ता मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचे गूढ अजूनही कायम आहे. या विमानाने बेपत्ता झाल्यानंतर तालिबानी भागातून प्रवास केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यासाठी हे विमान अवघ्या पाच हजार फूट उंचीवरून उडवण्यात येत होते. दरम्यान, विमानातील संदेशवहन यंत्रणा बंद झाल्यानंतर या विमानाच्या सहवैमानिकाने अखेरचा संदेश पाठवल्याचा पुरावा सापडला आहे. या बेपत्ता विमानाचा शोध २६ देशांच्या शोध पथकांद्वारे घेतला जात आहे. तरीही या विमानाचा थांगपत्ता लागलेला नाही. या विमानाच्या कॉकपिटमधून सहवैमानिकाने अखेरचा संदेश पाठवल्यानंतर या विमानाची स्वयंचलित प्रणाली कार्यरत करण्यात आली, असे एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोहरी याह्या यांनी सांगितले. या विमानाचे वैमानिक कॅप्टन जहारी अहमद शहा आणि प्रथम अधिकारी फारिक अब्दुल हमीद यांच्यावर संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू झाला आहे. 

सहवैमानिकाच्या अखेरच्या संभाषणानंतर १२ मिनिटांनी विमानाच्या संदेशवहन यंत्रणेने शेवटचा संदेश पाठवला. या विमानाच्या प्रमुख वैमानिकाच्या अत्याधुनिक फ्लाइट सिम्युलेटरची तपासणी सुरू केली आहे. विमानाची संदेशवहन यंत्रणा बंद करण्याचे काम केवळ अत्यंत प्रशिक्षित वैमानिकच करू शकतो. त्यामुळेच हे विमान रडारवर दिसू शकले नाही, असे मलेशियाच्या अधिका-यांनी सांगितले.

Leave a Comment