प्रदूषणामुळे फ्रान्समध्ये वाहन वापरावर निर्बंध

पॅरिस- फ्रान्सची राजधानी पॅरिस आणि आसपासच्या परिसरातील प्रदूषणाची पातळी गेले काही दिवस सातत्याने धोकादायक पातळीवर असल्याने फ्रान्स सरकारने खासगी कार आणि मोटरबाईकच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार आता शेवटचे नंबर सम असलेली वाहने आणि विषम नंबर असलेली वाहने एक दिवसाआड रस्त्यावर आणावी लागणार आहेत. १९९७ नंतर असा प्रतिबंध लावायची ही दुसरी वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून चीनची राजधानी बिजिंग प्रथम क्रमांकावर आहे. पॅरिसमधील सध्याची प्रदूषण पातळी बिजिंगच्या जवळपास असल्याचे पर्यावरण तज्ञांचे मत आहे. सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यास लोक प्रवृत्त व्हावेत म्हणून शुक्रवार ते सोमवार असे तीन दिवस ही सेवा मोफत पुरविण्यात आली आहे. रात्री थंड, दिवस गरम अशा हवामानामुळे वाहनांतून बाहेर पडणारा धूर हवेतच साठत असून त्यामुळे धुक्याचे दाट आवरण शहरावर तयार झाले आहे. यामुळे प्रदूषणात वाढ झाली असून प्रदूषण कमी करण्यासाठीच वाहन वापरांवर निर्बंध लादले गेले आहेत. सोमवारपासून हे निर्बंध लागू झाले आहेत.

Leave a Comment