पैसा झाला मोठा पक्ष झाला खोटा

भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वांपेक्षा वेगळा आहे असा दावा या पक्षातर्फे केला जात असतो पण आता तो राहिलेला नाही. पूर्वी मात्र भाजपा आणि त्यातल्या त्यात जनसंघाचे नेते तसेच मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते खरोखरच वेगळे होते. आपल्या स्वार्थापेक्षा आपल्या पक्षाचा स्वार्थ मोठा असे मानून ते कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न बाळगता काम करीत असत. असे अनेक कार्यकर्ते या पक्षांत जन्मभर काम करीत राहिलेले होते. आता स्थिती बदलली आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा अशी शिकवण त्यांना दिली जात होती. आज आपल्या देशाच्या राजकारणामध्ये कार्यकर्ते मंडळी देशाच्या स्वार्थाला गौण ठरवून पक्षाच्या स्वार्थाला प्राधान्य द्यायला लागली आहेत आणि पक्षाच्या स्वार्थाला गौण ठरवून   व्यक्तीला स्वार्थाला प्राधान्य द्यायला लागली आहेत. हे नेमके उलटे चाललेले आहे. त्यामुळे राजकारणाचे, विविध राजकीय पक्षांचे आणि देशाचेही अधःपतन होत आहे. आज  नेमके काय चुकत आहे. हे बर्‍याचदा लक्षात येत नाही. पण थोडा विचार केला म्हणजे स्वार्थाचे प्राधान्यक्रम बदलले ही एक मोठीच चूक झाली असल्याचे लक्षात येते. कधी कधी या अधःपतनाचे काही परिणाम राजकीय जीवनात प्रत्यक्ष उदाहरणाने दिसून येतात. 

मराठीतली सुप्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकर हिला कोणा तरी पत्रकाराने या निवडणुकीत कोणाचा प्रचार करणार असा प्रश्‍न विचारला असता तिने सरळ सरळ सांगून टाकले. आपल्याला जो उमेदवार किंवा पक्ष जास्त पैसे देईल त्याचा प्रचार आपण करणार. काही लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. लोकशाहीत प्रत्येक सुशिक्षित मतदाराने काही विचार बाळगला पाहिजे आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या विचाराच्या उमेदवाराचे समर्थन केले पाहिजे. वेळ मिळाल्यास त्याचा प्रचारही केला पाहिजे. असे या नाराज लोकांचे म्हणणे आहे. पैसे तर घ्यायचे. जो पैसे जास्त देईल त्याचा प्रचारही करायचा पण आपण करीत असलेल्या प्रचाराचा पैशाशी काही संबंध आहे याचा कोणालाही पत्ता लागू द्यायचा नाही अशी स्ट्रॅटेजी तिने समोर ठेवायला हवी होती. राजकारणात काम करणे हे जाहीरात मॉडेलसारखेच असते पण या दोन कामात एक मोठा फरक असतो. जाहीरात मॉडेलच्या व्यवहारात पैशाची देवाणघेवाण अपेक्षितच असते तशी ती राजकारणात नसते. आधी प्रचाराचा उमेदवार ठरवायचा असतो. पैशाची देवाणघेवाण करायची असते पण ती चोरून करायची असते कारण ती प्रचार करणार्‍यालाही उघड करायची नसते आणि उमेदवारालाही आचारसंहितेमुळे झाकून करायची असते. 

एकदा पैसे मिळाले की, उमेदवाराच्या पक्षाचा विचार करून आपण त्याचा प्रचार का करीत आहोत याची कारणे तयार करावंी लागतात आणि त्यांच्यावर विचारांचा मुलामा चढवावा लागतो. केवळ निवडणुकीत कोणत्या तरी पक्षाचा प्रचार करणारे सेलिब्रिटीज असेच धोरण आखत असतात. म्हणजे असे की, आपला पैशाचा सौदा कॉंग्रेसच्या उमेदवाराशी पक्का झाला असेल तर, आपण भाजपाच्या जातीयवादाशी मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेसचा प्रचार करीत आहोत असे ठोकून द्यायचे असते. आपला सौदा भाजपाशी झाला असेल तर आपण महागाईने त्रस्त झालेल्या जनतेची चीड विचारात घेऊन त्यांच्या कल्याणासाठी भाजपाचा प्रचार करीत आहोत असे ठोकून द्यायचे असते. ही गोष्ट सईला कळली नाही पण राजकारणात मुरलेले अनेक लोक असेच करीत असतात. काही कार्यकर्त्यांना पक्षांतराचे वेध लागतात. आपण आता या पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येणे शक्य नाही याची त्याला जाणीव होते. तो लगेच इकडून तिकडे उडी मारतो.  त्याचा या उडीमागचा हेतू पूर्णपणे वैयक्तिक स्वार्थावर आधारलेला असतो पण तो कारणे सांगताना मात्र अनेक कारणे बनवून सांगतो. कधी त्या पक्षात घुसमट झाली असल्याचा बहाणा करतो तर कधी पक्षाने आपला विचार सोडलाय असे कारण पुढे करतो. 

तो जाहीरपणे सांगत असलेली कारणे खरी नसतात हे सर्वांना माहीत असते पण तो वेड्याचे सोंग घेत असतो आणि जगालाही वेडा समजत असतो. काही महत्वाकांक्षी नेते आणि कार्यकर्ते आपण आहोत त्या पक्षात आपल्या कामना पूर्ण होणार नाहीत हे दिसायला लागताच पक्षाला रामराम ठोकतात तर काही नेते पक्षाला कायमचा जय महाराष्ट्र करतात. पक्षाला अखेरचा लाल सलाम करणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या कमी असते. काही थोर नेते तर इतकी बेमालूम तात्त्विक भाषा वापरतात की त्यामुळे ते खरोखरच देशाच्या कल्याणापोटी पक्षांतर करीत आहेत असे लोकांना वाटायला लागते. काही नेत्यांची पक्षांतराची कारणे सरळ सरळ आर्थिक असतात. त्यांना आहेत त्या पक्षापेक्षा इतर पक्षात जास्त पैसा मिळण्याची क्षमता असते. म्हणून ते पक्ष सोडून देऊन नवा घरोबा करतात. नव्या घरातही अपेक्षेप्रमाणे काही मिळाले नाही की, पुन्हा स्वगृही यायलाही कचरत नाहीत. लाजत नाहीत. आपण वारंवार पक्षाशी प्रतारणा करणे हे पाप आहे असे मनातून वाटत असते पण ते तसे दाखवत नाहीत. आपण आता पक्षांतर केले नाही तर जनतेचे मोठे नुकसान होणार आहे असे ते भासवतात. जनतेलाही ते खरे वाटते.