पाकिस्तानात मंदिर, गुरुद्वारांवर हल्ले सुरूच

कराची – पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये मुस्लीम धर्मियांच्या पवित्र ग्रंथाचा अवमान झाल्याच्या प्रकारातून जातीय दंगली उसळल्या आहेत. अवमानामुळे चिडलेल्या मुस्लीम धर्मियांनी  काल सिंध प्रांतातील हिंदू मंदिरांवर आणि शीख गुरुद्वारांवर हल्ले केले. या घटना कळल्याबरोबर पोलिसांनी आणि सुरक्षा जवानांनी अल्पसंख्यकांच्या धार्मिक स्थळांना सुरक्षा प्रदान केली. सिंध प्रांतात हा विद्ध्वंस मर्यादित आहे, पण बलुचिस्तानात हिंसाचाराचे प्रमाण अधिक आहे.

बलुचिस्तानामध्ये हिंदू आणि शिखांच्या धार्मिक स्थळांना आगी लावण्यात आल्या. शिवाय बलुचिस्तानच्या विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. जाफराबाद शहरामध्ये अनेक दुकाने जाळण्यात आली. डॉन या दैनिकाने दिलेल्या वृत्तात मोठ्या प्रमाणावर जमलेल्या जमावांनी मंदिरे जाळण्याचा प्रयत्न केला असे म्हटले आहे. 

अशा एका प्रकारात डेरा अल्लायार या गावात मंदिर जाळणार्‍या जमावावर पोलिसांनी लाठी हल्ला केला, पण जमाव आटोक्यात न आल्यामुळे हवेत गोळीबार केला. जाफराबाद, नसीराबाद, सोबतपूर या शहरांमध्ये सगळी दुकाने बंद होती. हिंदू आणि शिखांच्या वस्त्यांना सुद्धा पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. मुस्लीम धर्मग्रंथाचा अवमान करण्याचा आरोप असलेल्या हिंदू व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Comment