आयाराम हवेत, गयाराम नकोत

काल राहुल नॉर्वेकर यांनी शिवसेनेचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवारांनी त्यांना  पक्षात प्रवेेश तर दिलाच पण लगेच मावळची उमेदवारीही दिली. डॉ. विजयकुमार गावित हे त्यांच्या पक्षाचे मंत्री. ते राष्ट्रवादीतच आहेत पण त्यांची कन्या भाजपात जाणार आहे. हे ऐकल्यावर मात्र अजित पवार खवळले. विजयकुमार गावित यांच्या कन्येला ज्या क्षणी भाजपाची उमेदवारी मिळेल त्या क्षणाला गावित यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल असे त्यांनी जाहीर केले. याचा अर्थ असा की आयाराम आपल्या पक्षात आले तर स्वागत आहे गयाराम आपल्या पक्षातून चालले तर मात्र त्यांना शिक्षा केली जाईल. नार्वेकर यांना केवळ प्रवेशच दिला असे नाही तर  त्यांना मावळ मतदारसंघातली राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळू शकते हे पाहूनच किंबहुना त्या अटीवरच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. एकदा तिकडे गेल्यावर उमेदवारी मिळते आणि शिवसेनेत राहून महत्वाकांक्षेला प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात यायला लागते तेव्हा शिवसेनेत जीवाची घुसमट व्हायला लागते. साहजिक आहे.  जिथे इच्छा पुरी होईल तिथे जीव खुलतो आणि जिथे ती मारली जाते तिथे तो घुसमटतो. काल शिवसेनेत राहून हिंदुत्वाच्या वल्गना करणारे नार्वेकर रात्रीतून सेक्युलर होऊन जातात. 

राजकारणात तत्त्व नावाचा काही प्रकार उरलेला नाही. कोणत्या पक्षात राहून काम करायचे हे तत्त्वावर ठरत नसून पद मिळण्याच्या अटीवर ठरते. तेव्हा निवडून येण्याची क्षमता ज्या पक्षात राहून वाढते तो आपला पक्ष अशी सोपी व्याख्या आता सर्वांनी मान्य केली आहे. नंदूरबारचे आमदार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आता भाजपाकडे वाटचाल करायला सुरूवात केली आहे. त्यांना तसे भाजपाचे काही आकर्षण नाही पण त्यांचे डॉक्टर कन्या हीना ही भाजपाकडे आकृष्ट झाली आहे. तिला खरे तर भाजपाचे आकर्षण का निर्माण झाले आहे हे माहीत नाही पण तिला एक गोष्ट लक्षात आली आहे की, तिच्या नंदूरबार मतदारसंघात माणिकराव गावित हे १९८० पासून निवडून येत आहेत आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती असल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून त्यांना कधीच संधी मिळू शकत नाही. म्हणून त्यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आणि भाजपालाही त्यांच्या रूपाने समर्थ उमेदवार मिळत आहे. भाजपा- सेना युतीच्या जागावाटपात ही जागा भाजपाकडे आहे म्हणून डॉ. हीना यांना भाजपा बरा वाटला. पण ही जागा शिवसेनेकडे असती तर त्यांना शिवसेना चांगली वाटली असती. 

गावित यांचाही जीव राष्ट्रवादीत घुटमळतच आहे कारण त्यांना आता ही गोष्ट लक्षात आली आहे की, देशात मोदी लाट असेल तर आपली कन्या त्या लाटेत खासदार होऊ शकते. ही संधी घरात चालून आली असताना आपण अजित दादांच्या धमकीपुढ नमलो तर आपल्या पुढच्या पिढीचे नुकसान होईल असे त्यांना वाटत आहे आणि त्यामुळे त्यांचाही जीव घुसमटतो आहे. पण आपल्या पक्षात कोणाचा जीव घुसमटला तरी त्यांनी पक्ष सोडता कामा नये पण शिवसेनेत कोणाचा जीव घुसमटायला लागला की मात्र त्यांनी आपल्या राष्ट्रवादीत यायला काही हरकत नाही. निवडणुकीच्या तोंडावर सर्वत्रच अशा घुसमटी सुरू होतात. कारण शेवटी महत्त्वाकांक्षांना पंख फुटण्याचे हेच दिवस असतात. आजकाल कोणताच कार्यकर्ता विचारासाठी काम करीत नाही. तो एखाद्या पक्षात येतो तोच कसले ना कसले पद मिळेल या आशेनेच येत असतो. तो कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली काम करायला लागतो आणि आपल्या नेत्याची आर्थिक प्रगती दिवसेंदिवस कशी होत आहे हे जवळून पहात असतो. आपणही पक्षाचे काम करतो आणि आपला नेताही कामच करतो पण तो बघता बघता लक्षाधीश होतो आणि आपण मात्र कायम सतरंज्या अंथरत आणि त्यांच्यासाठी रेस्ट हाऊस बुक करीत बसतो. 

याची जाणीव होताच त्याच्याही मह्वाकांक्षेला पंख फुटतात आणि तो पक्षनिष्ठेची किमंत मागायला लागतो. ती मिळाली नाही की तो नाराज होतो. त्याची अस्वस्थता  विरोधी पक्षांना कळली की ते त्याच्यासाठी एखादे तिकिट किंवा तिकिटाचे आश्‍वासन तयार ठेवतात. त्या जाळ्यात तो पटकन अडकतो आणि बघता बघता तो, ‘हजारो अनुयायांसह’ त्या पक्षात जातो. तो गेलेला असतो तो स्वार्थासाठी पण त्याला आवरण देतो तत्त्वाचे. ती आवरणेही बाजारात मिळतात. कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात जायचे आहे यावर ती अवलंबून असतात. जातीयवादाचा मुकाबला करण्यासाठी, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी,  पवारांचे हात बळकट करण्यासाठी, घराणेशाही गाडून टाकण्यासाठी अशा अनेक आवरणांतून योग्य ते आवरण चढवून तो आपल्या स्वार्थाला उदात्त बनवतात. या गोष्टी  जुन्या लोकांना वाईट वाटतात पण आजकाल अनेक लोक त्याचे समर्थन करायला लागले आहेत आणि त्यात काही चूक काही असे म्हणायला लागले आहेत. म्हणजे पदाची लालसा ही साहजिक आहे असेच मानले जायला लागले आहे. पदासाठी पक्ष ही कल्पना सर्वांनी मान्य केली आहे. तत्त्वासाठी पक्ष, सेवेसाठी पक्ष ही कल्पना कोणालाच मान्य नाही.

Leave a Comment