डॉ. गावित भाजपच्या वाटेवर

मुंबई – नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित राष्ट्रवादीला राम-राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कन्या डॉ. हिना गावित यांना भाजपकडून नंदुरबारचं तिकीट मिळणार असल्यानं ते राष्ट्रवादीशी काडीमोड घेत असल्याचं समजतं. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्या नऊ निवडणुकांमध्ये माणिकराव गावीत या मतदारसंघातून विजयी झालेत आणि यंदाही काँग्रेसनं त्यांनाच रिंगणात उतरवलंय. 

नंदुरबारमधील माणिकरावांची मक्तेदारी मोडून काढणं खूपच कठीण आहे. परंतु, यंदा काँग्रेसविरोधी वातावरण असल्यानं भाजपला या संधीचा पुरेपूर फायदा उचलायचाय. म्हणूनच माणिकराव गावितांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे राष्ट्रवादीचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हिना गावित यांना नंदुरबारचं तिकीट देण्याचं भाजपनं जवळपास निश्चित केलंय. त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही, पण १८ मार्चला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही माळ त्यांच्याच गळ्यात पडेल, असं सूत्रांकडून समजतं. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर विजयकुमार गावितांना राजीनाम्याचा आदेशच दिलाय. 

हिना गावित भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढणार असतील, तर तुम्ही राजीनामा द्या, असं त्यांनी बजावलंय. ही ‘दादा’गिरी गावितांच्या जिव्हारी लागल्यानं ते लवकरच राष्ट्रवादीचा निरोप घेतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. या संदर्भात भाजप नेते एकनाथ खडसे यांना याआधीच संकेत दिल्याचं समजतं. या सगळ्या घडामोडींमुळे नंदुरबारचं राजकारण ढवळून निघणार आहे. डॉ. विजयकुमार गावित आणि माणिकराव गावित यांच्यात विस्तवही जात नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे त्यांचे प्रयत्न सतत सुरू असतात. अशावेळी, विजयकुमार गावित यांची ताकद भाजपला मिळाल्यास ते माणिकरावांना शह देऊ शकतात. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबारमध्ये गावितद्वयीची प्रतिष्ठा पणाला लागणार, असंच चित्र दिसतंय.

Leave a Comment