डाव्या पक्षांचे धार्मिक वळण

तिरुअनंतपुरम् – भारतात आता आतापर्यंत डाव्या आघाडीच्या हातात पश्‍चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा ही तीन राज्ये होती. त्रिपुरा हे छोटे राज्य असल्यामुळे डाव्यांच्या हातामध्ये अडीच राज्ये आहेत. असेच म्हटले जात होते. आता त्यातली केरळ आणि पश्‍चिम बंगाल ही दोन राज्ये गेलेली आहेत आणि केवळ त्रिपुरा हे छोटे राज्य डाव्या पक्षांच्या हातात आहे. डाव्या पक्षांची विचारसरणी ही भांडवलदार विरोधी आणि धर्मविरोधी आहे. मुळात त्यांना सांसदीय राज्यपध्दतीच मंजूर नाही. परंतु भारतातल्या डाव्या चळवळीने १९५० च्या दशकातच सांसदीय राज्यपध्दती स्वीकारली. १९९० नंतर  सार्‍या जगाच्या अर्थकारणात समाजवाद संपला आणि भारतातल्याही साम्यवाद्यांनी भांडवलदारांचे लांगुलचालन सुरु केले. आता डाव्या पक्षांचे डावेपण राहिले तरी कशात असा प्रश्‍न विचारला जातो. 

या प्रश्‍नाचे त्यांच्या दृष्टीने एक उत्तर होते. ते म्हणजे डावे पक्ष आपला निधर्मीवाद टिकवून आहेत आणि यातच त्यांचे डावेपण शिल्लक आहे. आजपर्यंत भारतीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामील होत त्यांनी हुकूमशाही आणि सरकारी अर्थव्यवस्थेला सोडचिठ्ठी दिली. पण केवळ निधर्मीवाद मात्र टिकवून ठेवला. आता मात्र हा निधर्मीवादसुध्दा त्यांनी सौम्य करत आणला आहे. केरळमध्ये गेल्यावर्षी झालेल्या माकपाच्या अधिवेशनात धर्म या विषयावर आपले धोरण काय असावे यावर विचार करणारे काही प्रबंध सादर केले गेले. साम्यवादी विचारसरणीत मुळात धर्माला अफुची गोळी म्हटले आहे. त्यामुळे साम्यवादी देशात मंदिर, मस्जिद, चर्च यांना परवानगी नसते. धार्मिक उत्सवावर बंदी असते. 

भारतात अशी बंदी घालणे योग्य आहे का? माकपाचे यावरचे धोरण काय असावे ? याबाबत विचारविनिमय करून माकपाने आपला धर्माला असलेला विरोध सोडून देण्याचे ठरवले आहे. धर्मातले वेडाचार आणि कर्मकांड हे कालबाह्य ठरले तरी बदलले जात नाहीत आणि धर्म हाच एक प्रगतीतला अडथळा ठरतो. परंतु भारतातले लोक धार्मिक प्रवृत्तीचे आहेत आणि त्यामुळे धर्म ही संस्थाच नको  असे सांगणारा विचार भारतात कधीच मूळ धरु शकत नाही. आजवर ही गोष्ट सावरकर, आंबेडकर, विवेकानंद, गांधी या सर्वांनी सांगितली आहे. परंतु डाव्या पक्षांना ती आजपर्यंत मान्य नव्हती. आता त्यांना ही वस्तुस्थिती कळायला लागली आहे.  केरळमध्ये लोकसभेच्या २० जागांसाठी निवडणूक होत आहे आणि डाव्या आघाडीने धार्मिक संघटनांच्या सहा उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. या सहा उमेदवारातला एकही उमेदवार डाव्या चळवळीशी संबंधित नाही, कसलेही निधर्मीवादी काम करण्याबाबत ओळखला जात नाही. केवळ ख्रिश्‍चन आणि मुस्लीम या दोन अल्पसंख्य जात गटात त्यांचे वर्चस्व आहे. एवढ्याच कारणावरून डाव्या आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे.  या पाठिंब्यातून डाव्या आघाडीने आपल्या वर्ग संघर्षाच्या तत्वापासून फारकत घेऊन जातीय संघर्षाच्या तत्वाला पाठिंबा दिल्याचे दाखवून दिले आहे. 

डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेल्या सहा उमेदवारांत ५ ख्रिश्‍चन आणि एक मुस्लीम आहे. तिरुअनंतपुरम् या राजधानीच्या शहरात कॉंग्रेसचे उमेदवार शशी थरुर यांच्या विरोधात कॉंग्रेसने ख्रिश्‍चन संघटनेचे प्रमुख असलेले डॉ. बेनेट अब्राहम यांना पाठिंबा दिला आहे. वास्तविक पाहता या मतदारसंघात डाव्या आघाडीकडे बरेच उमेदवार होते. पण त्यांना डावलून या ख्रिश्‍चन व्यक्तीला पाठिंबा दिला आहे. पोन्नाई मतदारसंघात मागच्या निवडणुकीत डाव्या आघाडीने धर्म वेडे मुस्लीम उमेदवार आणि दहशतवादी कारवायातील आरोपी अब्दुल नासीर मदानी यांना पाठिंबा दिला होता. परंतु या पाठिंब्यामुळे डाव्या आघाडीला हिंदुंची मते गमवावी लागली आणि तिथे कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आला. यावेळी पुन्हा डाव्या आघाडीने पुन्हा तिथे मुस्लीम उमेदवाराला पाठिंबा दिला आहे पण तो उमेदवार दहशतवादी संघटनेशी  संबंधित नाही. 

डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेले अन्य चार ख्रिश्‍चन  उमेदवार मध्य केरळातील आहेत. यापूर्वी ख्रिश्‍चन जनतेचे प्रतिनिधीत्व करणारा केरळ कॉंग्रेस (जोसेफ) हा पक्ष डाव्या आघाडीतच होता. परंतु २००९ साली या पक्षाने डाव्या आघाडीतून फुटून कॉंग्रेसप्रणित आघाडीत प्रवेश केला. ख्रिश्‍चन समाजाचा म्हणवला जाणारा हा पक्ष दूर गेल्यामुळे डाव्या आघाडीला ख्रिश्‍चन मतदारांना खूष करण्यासाठी काहीतरी करावे लागणार होते. त्याचाच एक भाग म्हणून या पक्षाने एर्नाकूलम् (ख्रिस्टी फर्नांडिस), इडुक्की (जॉयस जॉर्ज), चलक्कुडी (चित्रपट अभिनेता इनोसंट) आणि पट्टनमथिट्टा (फिलिपोज थॉमस) या चार उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. एकंदरीत धर्माला अफुची गोळी मानणार्‍या डाव्या आघाडीने भारतीयांच्या धार्मिक प्रवृत्तीपुढे नांगी टाकली आहे.

Leave a Comment