तेलंगणाही हातचे चालले

आंध्र प्रदेशाचे विभाजन केल्यामुळे सीमांध्र भाग कॉंग्रेसच्या हातातून निसटला आहे, परंतु सीमांध्र भाग निसटला तरी चालेल, निदान तेलंगणा तरी आपल्या हातात राहील हा कॉंग्रेसच्या नेत्यांचा अंदाज फोल ठरत आहे. तेलंगणातल्या लोकसभेच्या १७ जागांवर त्यांची नजर होती. कॉंग्रेसने तेलंगणाची निर्मिती केल्यामुळे तेलंगणाचे मतदार कॉंग्रेसला भरभरून मतदान करतील आणि तेलंगण राष्ट्र समितीला सोबत घेऊन किंवा या पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करून १७ जागा कॉंग्रेसच्या पक्षबलात जमा करता येतील अशी स्वप्ने कॉंग्रेसचे नेते पहात होते. परंतु या पक्षामध्ये आता परिपक्व विचार करणारा नेता कोणी शिल्लक राहिला आहे की नाही, असा प्रश्‍न काही वेळा पडतो. कारण कॉंग्रेसच्या नेत्यांची पावले वाकडीच पडायला लागली आहेत. तेलंगणात त्यांच्या या वाकड्या पावलामुळे १७ जागा तर दूरच पण सात जागा सुद्धा मिळण्याची शक्यता आता दिसत नाही. दिग्विजयसिंग हे कॉंग्रेसचे सरचिटणीस आहेत आणि आंध्र प्रदेशाच्या राजकारणाचे ते प्रभारी आहेत. म्हणजे आंध्र प्रदेशाचे तसेच तेलंगणाचे कॉंग्रेसचे राजकारण हे दिग्विजयसिंग यांचे राजकारण आहे. हा माणूस केवळ तोंडानेच फाटका आहे असे नाही तर त्याचे राजकारण सुद्धा तिरपागडेपणाचे आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे आंध्रातले राजकारण तर फसलेच, पण आता तेलंगणातले राजकारण सुद्धा आत्मघातकीपणाचे ठरायला लागले आहे.

केवळ आंध्र किंवा तेलंगणच नव्हे तर दक्षिण भारतामध्ये कॉंग्रेसच्या राजकारणाची मोठी फरपट झाली आहे. कर्नाटकामध्ये भाजपातली गटबाजी आणि येडीयुरप्पा यांचे बाहेर पडणे यामुळे भाजपाची वाताहत झाली आहे. पक्षाला विधानसभा निवडणुकीत सत्ता गमवावी लागलेली आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीत तिथे कॉंग्रेसला चांगल्या जागा मिळतील अशी कॉंग्रेसच्या नेत्यांची अपेक्षा होती. परंतु भारतीय जनता पार्टीने येडीयुरप्पा यांना पक्षात आणले असून कॉंग्रेसच्या आशा फोल ठरवल्या आहेत. तामिळनाडूत तर कॉंग्रेसशी युती करायला कोणी तयार नाही, त्यामुळे तिथले कॉंग्रेसचे नेते एवढे धास्तावले आहेत की, ते निवडणूक लढवायला सुद्धा तयार नाहीत. दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेशाच्या राजकारणात कॉंग्रेसची मोठी फजिती झाली. गेल्या निवडणुकीत आंध्रातून कॉंग्रेसचे ३६ खासदार निवडून आले होते आणि सत्ता संपादनासाठी त्यांचा मोठाच फायदा झाला होता. परंतु आता आंध्र हातातून गेला आहे. आंध्रातल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी विश्‍वासार्हताही गमावली आहे आणि मुख्यमंत्र्यांनीच पक्षाबाहेर पडून नवा पक्ष स्थापन केला आहे.

या उपरही कॉंग्रेसचे नेते एका फसव्या समाधानात जगत होते. उर्वरीत आंध्रातून पक्ष नष्ट झाला असला तरी तेलंगणात तो जास्त प्रभावीपणे टिकून राहील असा त्यांचा व्होरा होता. कारण तेलंगणाच्या निर्मितीमुळे सीमांध्र भागातले लोक कॉंग्रेसविषयी नाराज असले तरी तेलंगण निर्मितीमुळे तेलंगणातले लोक तरी आपल्यावर प्रसन्न असतील असे त्यांचे गणित होते. तेलंगणाची निर्मिती कॉंग्रेसने केली आहे, असे लोकांना वाटते असा कॉंग्रेस नेत्यांचा समज आहे. त्यामुळेच तेलंगण निर्मितीचे आंदोलन करणार्‍या तेलंगण राष्ट्र समिती या पक्षाला सहज खिशात टाकून तेलंगणात आपले वर्चस्व निर्माण करता येईल अशा भ्रमात कॉंग्रेसचे नेते वागत होते. म्हणूनच तेलंगण निर्मितीचा तिढा सुटताच दिग्विजयसिंग हैदराबादला गेले आणि त्यांनी या पक्षाचे नेते चंद्रशेखर राव यांच्या समोर पक्ष विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु चंद्रशेखर राव यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला तेव्हा पक्ष विलीन करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांचे मत पडले. म्हणून त्यांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला आणि आपला पक्ष कॉंग्रेसशी युती करू शकेल असे जाहीर केले. कॉंग्रेसच्या नेत्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले. चंद्रशेखर राव यांना सहज आपल्या कच्छपी लावता येईल ही त्यांची अपेक्षा फोल ठरली.

त्यामुळे त्यांनी नाईलाजाने या पक्षाशी युती करण्याबाबत चर्चा सुरू केली. पण कॉंग्रेसचे नेते मोठे कावेबाज असल्यामुळे त्यांनी एका बाजूला चंद्रशेखर राव यांना युतीबाबत चर्चा करण्यात गुंतवून ठेवले आणि दुसर्‍या बाजूला तेलंगण राष्ट्र समितीच्या एकेका कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षातून फोडून कॉंग्रेसमध्ये आणण्याची कारस्थाने सुरू केली. त्याचा परिणाम असा झाला की, युतीसाठी आवश्यक असणारे सौहार्द्राचे वातावरण टिकले नाही आणि तेलंगण राष्ट्र समितीने आता कॉंग्रेसशी युती सुद्धा करणार नाही असे जाहीर करून टाकले. या पक्षाचा हा टोला कॉंग्रेसच्या चांगलाच वर्मी लागला आहे. एवढेच नव्हे तर तेलंगण राष्ट्र समितीने कॉंग्रेसच्याच नेत्यांना आपल्या पक्षात आणायला सुरुवात केली. संयुक्त आंध्र प्रदेशातल्या किरणकुमार रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील सविता इंद्रा रेड्डी या आता तेलंगण राष्ट्र समितीत सामील होणार आहेत. चंद्रशेखर राव यांनी तर मोठी धक्कादायक माहिती जाहीर केली आहे. केवळ सविता इंद्रा रेड्डीच नव्हे तर कॉंग्रेसचे अनेक खासदार आणि आमदार तेलंगण राष्ट्र समितीमध्ये येण्यास उत्सुक आहेत असा दावा त्यांनी केला आहे आणि यात तथ्य आहे. म्हणूनच कॉंग्रेसच्या नेत्यांनी आता तेलंगणात चांगले स्थान मिळविण्याची आशा सोडून दिली आहे.

Leave a Comment