भ्रष्टाचारापुढे टाकली नांगी

देशातले सगळे राजकीय पक्ष नीतीमत्त्वाच्या गोष्टी बोलतात पण भ्रष्टाचारासमोर नांगी टाकतात. त्यांनी जनतेला माहितीचा अधिकार दिला आहे आणि त्यातून आपण देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत असा त्यांचा दावा आहे पण प्रत्यक्षात त्यांच्या निधीचा हिशेब कोणालाही माहितीच्या अधिकाराच्या कायद्याखाली मागता येत नाही. तसा बंदोबस्त या नेत्यांनीच केला आहे.  ते भ्रष्टाचाराच्या विरोधात भाषणे करताना कोणालाच हार जात नाहीत. पण निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचारी  कार्यकर्त्यांना पवित्र करून घेतात. त्यांचे हे वर्तन विसंगत असते पण ते त्याचेही मखमाली शब्दात समर्थन करतात. भारतीय जनता पार्टीने कर्नाटकात भ्रष्ट मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना आता  पावन करून घेतले आहे आणि शिमोगा मतदारसंघात त्यांना लोकसभेची उमेदवारीसुध्दा दिली आहे. दोन वर्षांपूर्वी येडीयुरप्पा भाजपासाठी भ्रष्ट होते आणि म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडावे असा आदेश त्यांना देण्यात आला. आपण भ्रष्टाचारापुढे नमणार नाही अशी शेखी मिरवत भाजपाच्या नेत्यांनी येडीयुरप्पांना पायउतार केले. त्यावेळी भ्रष्ट असणारे येडीयुरप्पा आता एकदम स्वच्छ झाले. कारण येडीयुरप्पा भाजपात नसतील तर कर्नाटकातून लोकसभेच्या भरपूर जागा मिळवता येणार नाहीत. हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा लोकसभेच्या जागांना प्राधान्य देऊन त्यांनी भ्रष्टाचारावर पांघरून टाकले. 

कर्नाटकातला खाण घोटाळा  हा तर जगभरात गाजलेला. त्या भ्रष्टाचारात हात बरबटलेल्या रेड्डी बंधूंना भाजपाने पक्षातून काढून टाकले. पण त्यांच्या शिवाय कर्नाटकातली सत्ता मिळणार नाही याचा साक्षात्कार होताच हेच श्रीराम रेड्डी भाजपाला अयोध्येतल्या रामापेक्षा पवित्र वाटायला लागले. त्यांच्यावर नमो मंत्र म्हणून अयोध्येतल्या शरयू नदीचे पाणी शिंपडून त्यांना भाजपाने शुध्द करून घेतले. या शुद्धीकरणावर सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली तरीही त्यांना कोणी दाद दिली नाही. एरवी भाजपाचे नेते भ्रष्टाचाराच्याविरुध्द फार मोठी भाषणे करत असतात. पण भ्रष्टाचाराच्या बाबतीत त्यांचे सत्यस्वरूप हे असे आहे.कॉंग्रेसचीही उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्या दिसणारे ठळक नाव म्हणजे  पवन बन्सल माजी रेल्वेमंत्री. माजी रेल्वेमंत्री असलेल्या पवन बन्सल यांना कॉंग्रेसने मंत्रीपदावरून काढून टाकले.  ते भ्रष्ट होते म्हणूनच त्यांना ही शिक्षा दिली. मग ते जर भ्रष्ट असतील तर त्यांचा उमेदवारांच्या यादीत समावेश करून सन्मान कसा केला गेला आहे? दरम्यानच्या काळात असे काय घडले की पवन बन्सल सभ्य नागरिक होऊन गेले? 

अशा लोकांच्या बाबतीत कॉंग्रेसचा एक युक्तीवाद असतो. तो म्हणजे आरोपी म्हणजे गुन्हेगार नव्हे. पवन बन्सल तर आरोपी आहेत. त्यांचा गुन्हा सिध्द होऊन ते गुन्हेगार ठरलेले नाहीत. तेव्हा त्यांना तिकिट द्यायला काही हरकत नाही. याच युक्तीवादाखाली चारा घोटाळा फेम लालूप्रसाद यादव युपीएच्या सरकारमध्ये पाच वर्षे रेल्वेमंत्री होते. पण बन्सल जर गुन्हेगार नव्हते तर त्यांना मंत्रीमंडळातून का काढून टाकले या प्रश्‍नाचे तर्कशुध्द उत्तर  मिळत नाही. गुन्हेगार असो की आरोपी असो, संशयित व्यक्ती मंत्रिमंडळात नकोच अशा भावनेने त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलेे असेल तर त्याच भावनेने उमेदवारीसुध्दा द्यायला नको. पण राजकीय पक्षांची कलंकित व्यक्तीची व्याख्या आपल्या राजकीय सोयीने बदलत असते. त्याच सोयीने अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांच्याही उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे आणि अशाच बदलत्या व्याख्यांनी भ्रष्ट शीला दीक्षित चक्क केरळच्या राज्यपाल झाल्या आहेत. गुन्हा सिध्द झालेला माणूसच गुन्हेगार असतो अशी जर कॉंग्रेसची व्याख्या आहे तर ती लालूप्रसादांना का लागू होत नाही. लालूप्रसादांचा गुन्हा सिध्द झाला आहे आणि ते गुन्हेगार ठरले आहेत. त्यावरून त्यांची खासदारकीसुध्दा गेलेली आहे. मग अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये कार्यरत असलेल्या पक्षाशी कॉंग्रेसचे नेते युती कशी करतात? 

अरविंद केजरीवाल यांचे काय? ते तर भारतातला भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपला जन्म झाला असल्याचा दावा करत असतात. पण त्यांनी आपल्या सोबत जेवण करण्यासाठी दहा हजाराचे शुल्क लावले होते. नागपूरमध्ये या कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला. हे बघून त्यांना एवढा उत्साह आला की त्यांनी बंगळुरुमध्ये हाच खेळ वीस हजार रुपयाला लावला. केवळ अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत जेवण करायला जे लोक दहा किंवा वीस हजार रुपये देतात त्या लोकांनी आम आदमी पार्टीला दिलेले ते दहा किंवा वीस हजार रुपये प्रमाणिकपणे कमावलेले आहेत याची काय खात्री? प्रामाणिकपणे पैसा कमावणारा माणूस असा मुर्खासारखा पैसा खर्च करतो का? केजरीवाल स्वत: सोडून इतर सर्वांना भ्रष्टाचारावर आत्मपरीक्षण करायला सांगत असतात पण त्यांंना त्या आत्मपरीक्षणाची सर्वाधिक गरज आहे. कारण ते तर हरिश्‍चंद्र तारामती सारखे सत्यवादी आहेत असा त्यांचा दावा आहे. एकंदरीत सगळेच एक  माळेचे मणी आहेत. सामान्य माणूस त्यांची भ्रष्टाचाराबद्दलची भाषणे ऐकत असतो आणि त्यांचे हे विसंगत वर्तन पाहून चक्रावून जात असतो.

Leave a Comment