उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय पक्षाचाच- नार्वेकर

मुंबई- विधान परिषद निवडणुकीतून अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे नेते राहुल यांच्यावर शिवसेना दोन दिवसात कारवाई करणार आहे. त्यााआधीच उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मला पक्षातील नेत्यांनीच सांगितले होते. उद्धव ठाकरे मुंबईत आल्यानंतर मी त्यांचे नाव जाहीर करणार आहे,’ असे मत शिवसेनेचे विधान परिषदेतील उमेदवार राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे माघार घेण्यास लावणारा शिवसेनेतील नेता कोण याबाबत चर्चा सुरु आहे.

२० मार्च रोजी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने नीलम गो-र्हे आणि राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती. भाजपनेही दोन उमेदवार उभे केले होते. मात्र संख्याबळ पाहता चार उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे अचानक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहूल नार्वेकर यांनी पक्षक्षेष्ठींना न सांगता उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शिवसेनेकडून आगामी काळात कारवाई करण्यात येणार आहे.

निवडणूकीपूर्वीच भाजपचे नेते विनोद तावडे यांचे निवडून येणे कठीण दिसत असल्याने त्यांनी व राष्ट्रवादीच्या एका नेत्यानेही नार्वेकर यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना याबाबत माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून नार्वेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र मी शिवसैनिक असून इतर पक्षात जाणार नसल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment