फेसबुक या बलाढ्य सोशल नेटवर्क साइटचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेकडून इंटरनेटवर केल्या जात असलेल्या हेरगिरी प्रकरणात कडक निषेध नोंदविला असून अमेरिकन सरकार हा इंटरनेटसाठी थ्रेट असल्याचा आरोप केला आहे. झुकेरबर्ग याने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना फोन करून आपले म्हणणे त्यांच्या कानावर घातले आहे.
झुकेरबर्ग म्हणतो, अमेरिकन सरकारकडून इंटरनेट विश्वात केला जात असलेला हस्तक्षेप आणि युजरची माहिती हेरगिरीने जमविण्याचे प्रकार हे अत्यंत तापदायक आहेत.सरकार आमच्या भविष्याचेच मोठे नुकसान करते आहे. दुर्देवाने यात सुधारणा होण्यासाठी आता दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागेल. गुप्तचर संस्थांच्या कामगिरीमुळे युजरच्या मनातील विश्वासालाच धक्का बसला आहे. आमचे इंजिनिअर अहोरात्र काम करून युजरची सुरक्षा कशी राखता येईल यासाठी कार्यरत असतात.यातून आम्ही युजर आणि सरकारचे गुन्हेगारांपासून संरक्षण करतो अशी आमची कल्पना होती पण येथे सरकारकडूनच होत असलेल्या हेरगिरीमुळे आम्ही निराश झालो आहोत. सरकारच्या या वर्तणुकीने इंटरनेट क्षेत्रातच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार या क्षेत्रासाठी चॅपियन असावे, थ्रेट नको.
फेसबुकच्या सर्व्हरची डुप्लिकेट बनवून त्याचा उपयोग अमेरिकन राष्ट्रीय संरक्षण संस्थेने त्यांचे मालवेअर इंटरनेटमध्ये घुसविण्यासाठी केला व त्यामुळे इंटरनेट युजरची सर्व माहिती त्यांच्या हाती विनासायास पडत राहीली हे उघड झाल्यानंतर मार्कने हे मत व्यक्त केले आहे.