मुंबई – महाराष्ट्रातील २८ जिल्हे गारपीटग्रस्त ठरले असून राज्यातल्या १४ लाख हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. राज्य सरकारने या नुकसानीचा प्राथमिक अंदाज केला असून तो ६ हजार ५०० कोटी रुपये एवढा असल्याचा अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाला आहे. राज्यातल्या २८ नागरिकांना आणि हजारो जनावरांना प्राण गमवावे लागले आहेत.
राज्य सरकार शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. पण सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे मदतीची घोषणा करता येत नाही. यातून काय मार्ग काढावा यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे प्रयत्न करत आहेत.
राज्य सरकार स्वत:च्या निधीतून साडे सहा हजार कोटी रुपयांची मदत देऊ शकत नाही. त्यामुळे केंद्राकडून मदत मिळविण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. साडे सहा हजार कोटी रुपयांचे नुकसान सुद्धा नुकसान भरपाईच्या जुन्या आकड्यावरून आणि निकषांवरून काढण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात नव्या निकषाने भरपाईची रक्कम काढल्यास ती यापेक्षा अधिक निघू शकते.