अमरावती- निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना शहरात ७६ लाख रुपये रोख सापडल्याने महापालिकेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळीही असेच एक कोटी रुपये अमरावतीत एका वाहनातून जप्त करण्यात आलेले होते. तथापि, ही रक्कम कोणत्या उमेदवाराची, हीच चर्चा आज सर्वत्र होती. वृत्त लिहीपर्यंत या रकमेचा उद्देश व ती कुणासाठी अमरावतीत आली, याचा उलगडा होऊ शकला नाही. अर्जुननगर सीलिंग पॉइंटवर पोलिसांनी एका कारमधून ७५ लाख ६४ हजार ६०० रुपये एवढी रोख जप्त केली. चालकासह रक्कम घेऊन येणा-या तिघांना पोलिसांनी पकडले. हे तिघेही नागपूरचे आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी अशाच स्वरूपात एक कोटी रुपयांची रोख पोलिसांनी पकडलेली होती. त्या रकमेवर आजपर्यंत कोणीही दावा केलेला नसल्याने ही रक्कम आधी अनेक महिने ट्रेझरीत व त्यानंतर बँकेत पडून आहे. पैसे वाहतूक करण्यासंदर्भात रिझव्र्ह बँकेने काही निकष ठरवून दिलेत. त्यानुसार ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगणे हा मुंबई पोलिस कायद्यानुसार गुन्हा ठरतो; परंतु नागपूरहून अमरावतीला येणा-या कारमध्ये ७५ लाख ६४ हजार ५०० रुपयांची रक्कम सापडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली. लाखो रुपयांची ही रक्कम अमरावतीत आचारसंहितेच्या काळात कशासाठी आणली, ही बाब स्पष्ट झालेली नाही.
आयकर किंवा विक्रीकर चुकविण्यासाठी या रकमेची अवैध मार्गाने वाहतूक होऊ शकते. याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी आयकर व विक्रीकर विभागाला या घटनेचा तपास करण्याची सूचना केली. अर्जुननगर परिसरातील सीलिंग पॉइंटवर चोख कर्तव्य बजावणा-या पांडुरंग गोरले, ज्ञानेश्वर अंबाडकर, गोवर्धन सोळंके, प्रमोद सहारे या चार पोलिसांना तसेच मनीष जोशी नामक होमगार्ड जवानाला रिवॉर्ड दिले जाईल, अशी घोषणा पोलिस उपायुक्त सोमनाथ घाग्रे यांनी या घटनेनंतर केली.