शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांची माघार

मुंबई- लोकसभेच्या धामधुमीत विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी होणारा संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेने आपला एक उमेदवार मागे घ्यावा यासाठी प्रयत्नशील असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना यश आले आहे. शिवसेनेचे दुसरे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी आज आपली उमेदवारी माघारी घेतला. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज दुपारी तीनपर्यंत मुदत होती. तसेच यासाठी जास्त अर्ज आल्यास 20 मार्चला निवडणूक होणार होती. मात्र, अखेर शेवटच्या दिवशी मतांचे गणित जुळत नसल्याने व घोडेबाजार रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांशी चर्चा करून उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. जर निवडणूक झाली असती तर भाजप किंवा शिवसेनेचा उमेदवार अडचणीत येत होता. मात्र, भाजपला मनसे मदत करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सेनेच्या उमेदवाराचा पराभव अटळ होता. अशा स्थितीत संभाव्य पराभव दिसताच माघार घेणे सोईस्कर असल्याने सेनेने हा निर्णय घेतला. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 10 अर्ज आले होते. मतांसाठी घोडेबाजार होऊ नये म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे खुद्द मुख्यमंत्री चव्हाण यांना वाटत होते. 

शिवसेनेने दोन उमेदवारांचा हट्ट सोडावा व एकाला माघार घेण्यास सांगावे, असे भाजपने सांगितले होते. मात्र, ताजा वाद पाहता भाजपने सेनेला फक्त विनंती केली. तसेच आपल्या कोट्यातील 47 पैकी पांडूरंग फुंडकर यांना 24 तर विनोद तावडे यांना 23 मतांचा कोटा दिला होता. उर्वरित मतांची जुळवाजुळव उमेदवारांनी करावी असे भाजपने या दोघांना सांगितले होते. मनसेच्या मदतीमुळे भाजप निश्चिंत होता. सेनेच्या एका उमेदवाराचा पराभव दिसताच नार्वेकर यांनी माघार घेणे पसंत केले. निलम गो-हे या ज्येष्ठ सदस्या असल्याने सेनेने त्यांना पसंती दिली व नार्वेकरांना आगामी काळात संधी देऊ असे सांगितले.

Leave a Comment