राजदच्या मुस्लीम – यादव कॉंम्बिनेशनला भाजपाचा धक्का

पाटणा – बिहार प्रदेश कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षांनी कॉंग्रेसचा त्याग करून लोक जनशक्ती पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेस आणि लालूंचा राजद पक्ष यांच्यातील युतीला  मोठा धक्का बसला. मात्र धक्क्याची ही परंपरा कालही  पुढे सुरु राहिली. लालूप्रसाद यादव यांचे ३५ वर्षे निकटचे सहकारी असलेले रामकृपाल यादव यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना भाजपातर्फे पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली जाणार आहे.

रामकृपाल यादव यांच्या या पक्षांतरामुळे लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षावर नेमका किती गंभीर परिणाम होतो याचे गणित मांडण्यात राजकीय निरीक्षक दंग आहेत. रामकृपाल यादव हे लालूप्रसाद यांचे निकटचे सहकारी होते परंतु यादव समाजात किंवा स्वतःच्या मतदारसंघात सुध्दा त्यांना स्वतःचा असा मजबूत जनाधार निर्माण करता आलेला नाही. त्यामळे लालूप्रसाद यादव यांना धक्का बसला नाही. पण बिहारमधल्या जातीय समीकरणाला नक्कीच धक्का बसला आहे. 

यादव आणि मुस्लीम या दोन समाजांच्या जोरावर लालूप्रसाद यादव यांच्या राजकीय उड्या होत्या. त्यातला यादव समाज  लालूंच्या समोर एकमुखाने उभा राहत होता. भाजपामध्ये यादव जातींचे प्रतिनिधित्व अजिबातच नव्हते. आता भाजपाला एक यादव चेहरा मिळाला आहे. त्याचा मोठा परिणाम होणार नसला तरी लालूप्रसाद यांचा राजकीय अधःपात जसजसा होत जाईल तसा यादव समाजातला नवा नेता उभरून वर येईल आणि तो नेता म्हणजे रामकृपाल यादव असतील. 

लालूंच्या नेतृत्वाचा अस्त फार दूर नाही. कारण त्यांना आता जामीन मिळाला असला तरी कारावासाची शिक्षा भोगण्याकरिता कधी ना कधी तुरुंगात जावेच लागणार आहे. अशा वेळी यादव समाज रामकृपाल यांच्या मागे उभा राहिला तर तो भाजपाकडे आकृष्ट होईल.  त्याचा भाजपाला प्रचंड मोठा राजकीय लाभ होईल.

भाजपापासून फटकून राहण्याची शक्यता असलेला बिहारमधला दुसरा समाज म्हणजे मुस्लीम समाज. परंतु बिहार प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष महिबूब अली कैसर यांनी कॉंग्रेसचा त्याग करून रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे आणि हे मुस्लीम नेते अप्रत्यक्षपणे का होईना एनडीएच्या म्हणजेच भाजपाच्या जवळ आले आहेत. 

त्यांचा थेट राजकीय लाभ भाजपाला होणार नसला तरी लोक जनशक्ती पार्टी हा एनडीए आघाडीचा घटक झाला असल्यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना पण भाजपाला मुस्लीम मतांचा लाभ होणार आहे. भारतीय जनता पार्टीशी मुस्लीम मतदार फटकून वागत असले तरी बिहारमधले चित्र बरेचसे वेगळे आहे. गेली १७ वर्षे भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (यु) यांच्यात युती होती आणि या युतीतून भाजपाचे ३१ आमदार मुस्लीम बहुल मतदारसंघातून निवडून आले होते.

भारतीय जनता पार्टी हा पक्ष बिहारच्या निदान काही मुस्लिमांसाठी तरी अस्पृश्य पक्ष नाही. अनेक मुस्लीम भाजपाच्या संपर्कात आहेत आणि यावेळीसुध्दा ते भाजपाच्या संपर्कात राहणार आहेत. परंतु त्या समाजाचा भाजपाकडे ओढा वाढत आहे. यादव आणि मुस्लीम या लालूप्रसाद यादव यांच्या विनिंग कॉम्बिनेशनला भाजपाने नक्कीच धक्का दिलेला आहे.

Leave a Comment