मोदींची लोकप्रियता शिवसेनेच्या मुळावर येणार?

मुंबई – भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावाची घोषणा केल्यापासूनच शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली होती आणि आता ही अस्वस्थता उघड स्वरूपात दिसूही लागली आहे. मोदींची वाढती लोकप्रियता आणि भाजपकडे अन्य राजकीय पक्षांचा वाढत चाललेला कल हे शिवसेनेसाठी धोक्याचे लक्षण असून महाराष्ट्रातून शिवसेनेची मुळे उखडली तर जाणार नाहीत ना ही चिंता शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांना सतावते आहे असे अंतर्गत सूत्रांकडून समजते.

लोकसभा निवडणुकांत युतीत असूनही सेना भाजपात सतत वाद होत आहेत. मात्र आक्टोबरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांत शिवसेना टिकेल का अशी पापशंका अनेकांना येते आहे. प्रखर हिंदुत्वावर शिवसेना वाढली मात्र प्रखर हिंदूत्वासाठी मोदीच अधिक प्रभावशाली ठरत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनाही या गोष्टीची जाणीव होती व म्हणूनच त्यांनी मोदींना निवडणुकांत स्टार प्रचारक म्हणून कधीच आणले नाही. इतकेच काय पण पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज यांना पाठींबा दिला होता. सेनेच्या या भूमिेकेमुळे संघही सेना नेत्यांवर नेहमीच नाराज होता असे जाणकार सांगतात.

युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन ठरले असले तरी बाळासाहेबांनी त्यांना नेहमीच दुसर्‍या स्थानावर ठेवले आणि भाजपला नेहमीच दुय्यम भूमिका घेणे भाग पाडले होते. मुंडेही त्याच पद्धतीने वागत असले तरी नितिन गडकरी संघाच्या अधिक जवळ असल्याने महाराष्ट्रात भाजपच्या भूमिकेचा नेहमीच विरोध करत आले आहेत. त्यातून राज ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक आणि राज ठाकरे यांनी भाजपवर दाखविलेली विशेष मेहेरबानी यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे.

राजनी भाजपवर केलेल्या या मेहेरबानीची फेड विधानसभा निवडणुकात भाजप करणार अशी शक्यता शिवसेना नेते बोलून दाखवित आहेत. मनसेला कदाचित युतीत घेतले जाईल व त्यामुळे शिवसेनेला विधानसभेसाठीच्या जागा कमी मिळतील अशीही भीती सेना नेत्यांत आहे. त्यातून मोदी पंतप्रधान बनलेच तर भाजपचा जोर वाढणार आहेच पण कदाचित युतीच्या हातात सत्ता आली तरी शिवसेनेला मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडणे भाग पडेल असाही जाणकारांचा अंदाज आहे.

Leave a Comment