प्रिया दत्तला पूनम महाजन आव्हान देणार, पुण्यातून जावडेकर, सोलापूरातून बनसोडे?

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची आज तिसरी यादी जाहीर होणार आहे. यात 150 उमेदवारांची घोषणा होईल असे सांगण्यात येत आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत आज बैठक होत आहे. यात उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन, भिवंडीतून मंगलप्रभात लोढा किंवा त्यांचा मुलगा अभिनंदन लोढा यांच्या नावासह पुण्यातून जावडेकर यांचे नाव जाहीर होण्याचे निश्चित मानले जात आहे. पुण्यातून बापट की शिरोळे हा यक्षप्रश्न सुटत नसताना संघाने सजेस्ट केलेल्या जावडेकरांच्या नावावर एकमत झाल्याचे कळत आहे. सोलापूरातून शरद बनसोडे तर लातूरमधून सुनील गायकवाड यांचे नाव जाहीर होऊ शकते. दरम्यान, मुंडे नाराज झाल्याचे वृत्त दिल्लीतही पोहोचल्याने लातूर व पुण्याचे नाव पुढे ढकलण्याची शक्यता आहे. 

लातूरमधून गायकवाड यांना मुंडेंचा विरोध असल्याचे कळते. तर पुण्यातून शिरोळेंना उमेदवारी द्यावी, असे मुंडेंना वाटत आहे.  पुणे लोकसभा मतदारसंघातून अनिल शिरोळेंचे नाव पुढे आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांच्याविरोधात शिरोळेचा 25 हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. आता कलमाडी रिंगणात नसतील त्यामुळे शिरोळेंचा विजय निश्चित आहे, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. मुंडेंनी शिरोळेंच्या नावाला पुन्हा पसंती दिली आहे. मात्र त्याचबरोबर आपली दावेदारी भक्कम आहे मी विजय खेचून आणू शकेन असे सांगत आमदार बापट यांनीही पक्षाकडे साकडे घातले आहे. संघ वर्तुळातून प्रकाश जावडेकर यांचे नाव पुढे आणले गेले आहे. प्रकाश जावडेकर राष्ट्रीय राजकारणात काम करतात, त्यांची प्रतिमा चांगली आहे.  

पुण्यातील नवा व सुशिक्षित मतदार जावडेकरांना स्वीकारतील असे संघातील धुरिणांचे म्हणणे आहे. त्यातच जावडेकरांना राज्यसभेत पाठवले गेले नाही. त्यामुळे जावडेकर लोकसभेसाठी चाचपणी करू लागले आहेत. पुण्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. कोणत्याही पक्षाला विजयाची खात्री देता येणार नाही, अशा स्थितीत जावडेकरांची लॉटरी लागू शकते असे भाजपमधील काहींना वाटत आहे. त्यामुळे दिल्लीतही पुण्यातील युवा व सुशिक्षीत मतदार खेचायचा असेल तर जावडेकरांची उमेदवारी फायदेशीर ठरू शकते असा प्रवाह आहे. संघ वर्तुळाच्या जवळ असलेले डॉ. विजय भटकर यांच्या नावावर चर्चा झाली होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने दिल्लीतील एक गट जावडेकरांबाबत सकारात्मक असल्याचे कळते. त्यामुळे जावडेकरांचेही नाव जाहीर होऊ शकते. मात्र पुणे भाजपने संघटनेतील कार्यकर्त्याला संधी द्या, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारते याकडे लक्ष आहे.

Leave a Comment