धांगडधिंगा म्हणजे परिवर्तन?

आम आदमी पार्टीने तिच्या स्थापनेच्या पहिल्या काही दिवसांत लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या पण अरविंद केजरीवाल हे किती पोरकटपणा करतात याचा अनुभव सर्वांना आला तेव्हा काही लोकांनी आम आदमी पार्टी ही काही दिवस जारी राहणारी राजकीय प्रक्रिया ठरेल आणि काही दिवसांनी थंड पडेल असे अनुमान करायला सुरूवात केली. आता आता तर असे वाटायला लागले आहे की, हे अल्पवेळचे भाकीत तरी खरे ठरते की नाही ? हे बाळ वर्षाचे होण्याच्या आतच संपून जाईल असे आता दिसायला लागले आहे. कारण आपल्याला नेमके काय करायचे आहे हे मुळात केजरीवाल यांनाच नीट समजलेले नाही. त्यांनी स्वतःला अनागोंदी पसरवणारा मुख्यमंत्री म्हणवून घेतले होते. पण अशा अनागोंदीला एक शिस्तही हवीच.  तसेही काही दिसत नाही. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत लोकांची जी मते व्यक्त होत असतात त्यांची दखल घेऊन आपल्या वर्तनात आणि दृष्टिकोनात काही बदल घडवावा अशी त्यांची प्रवृत्तीच दिसत नाही. त्यामुळे  ते नित्य नवीन काही तरी वेगळे करू मागत आहेत. काहीही न करता ते शांत बसले आणि त्यांचे नाव माध्यमात झळकले नाही की ते अस्वस्थ होतात आणि काही तरी करायला लागतात.

आता तर ते परिवर्तनाच्या नावावर नावावर चक्क मर्कटचेष्टा करत सुटले आहेत. त्यांनी दिल्लीत २८    जागा मिळवल्या तेव्हा त्यांच्या रुपाने देशामध्ये एक नवी राजकीय शक्ती उगवली असल्याचा साक्षात्कार काही राजकीय निरीक्षकांना झाला होता. परंतु गेल्या काही दिवसातल्या केजरीवाल यांच्या बाळलीला इतक्या अनावर झाल्या आहेत की त्यांच्याविषयीचे अंदाज तर चुकले आहेतच. पण त्यांच्या रूपाने तिसरी शक्ती उगवली असल्याचा साक्षात्कार झालेल्या राजकीय समीक्षकांची कुवतसुध्दा उघडी पडली आहे. काल केजरीवाल यांनी मुंबईत येऊन  रिक्षाने प्रवास केला. या पूर्वी राहुल गांधी यांनी एक दिवस लोकलने प्रवास केला होता. राहुल गांधी तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत. त्यामुळे युवराज राहुल गांधांनी लोकलमधून प्रवास करणे हा कौतुकाचा विषय झाला. त्यांच्या त्या प्रवासाने सामान्य माणसाला काय मिळाले हे माहीत नाही. किंबहुना लोकलने प्रवास करून राहुल गांधींच्याच डोक्यात काय प्रकाश पडला हाच संशोधनाचा विषय आहे. कारण त्यांनी लोकलने प्रवास केल्यानंतर लोकलच्या सेवेत काही बदल झाल्याचे किंवा तसा बदल त्यांनी रेल्वेला सुचवण्याचे काही ऐकण्यात नाही. मुळात त्यांनी त्यासाठी हा प्रवास केलाच नव्हता. आपण सामान्य माणसाचे मोठे चाहते आहोत असा भास निर्माण करण्यासाठी तो केला होता.

आता अरविंद केजरीवालसुध्दा तशीच स्टंटबाजी करण्यास प्रवृत्त झाले आहेत. त्यांनी केवळ लोकलने प्रवास न करता लोकलच्या आधी रिक्षाने प्रवास केला. राहुल गांधी असोत की अरविंद केजरीवाल असोत त्यांच्या या ढोंगांना भाळणारे लोक अजूनही या देशात आहेत. त्यामुळे केजरीवाल  रिक्षाने प्रवास करायला लागले तेव्हा  अनेकांनी त्यांच्या रिक्षात घुसण्याचा प्रयत्न केला. रिक्षात घुसलेल्या लोकांसह म्हणजे खरे तर रिक्षाला लटकलेल्या लोकांसह त्यांचा हा रिक्षा प्रवास पार पडला.  या रिक्षा प्रवासाच्या मार्गात झालेली हुल्लडबाजी बघून अरविंद केजरीवाल या देशात आणू पाहतात ते परिवर्तन नेमके कसे आहे याचे भेदक दर्शन या मार्गावरच्या मुंबईकरांना झाले. चर्चगेटपासून सीएसटीपर्यंत त्यांचा हा रिक्षा प्रवास झाला आणि ऐन गर्दीच्यावेळी ते आपल्या स्टंटबाजीसाठी लोकलमध्ये घुसायला लागले. मुंबईचा लोकलप्रवास म्हणजे नेमके काय हे ज्यांना माहीत आहे त्यांना हे उपटसुंभ जेव्हा लोकलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करायला लागले तेव्हा आपल्या रोजच्या गाडीत चढणे मुष्कील झाले. केजरीवाल यांनी यांनी लोकलमध्ये चढून आपले चित्रिकरण करून घेतले मात्र काल त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आप पार्टीच्या धुडगूस घालणार्‍या कार्यकर्त्यांमुळे  कित्येक प्रवाशांच्या गाड्या चुकल्या. 

अशा अनेक प्रवाशांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावाने मनसोक्त बोटे मोडली. एकंदरीत अरविंद केजरीवाल प्रकरण काय आहे हे बघून लोक आता वैतागायला लागले आहेत. कोणावरही आरोप करणे आणि गोंधळ घालून लोकांचे लक्ष वेधणे हीच त्यांची कार्यपध्दती आहे. त्यातून त्यांना देशात राजकीय परिवर्तन आणायचे आहे निदान त्यांचा तरी दावा तसा आहे. लोकांवर आरोप करणे सोपे आहे पण आपण ज्यांच्यावर आरोप करतो त्यांच्या आरोपाची चौकशी करून त्यांना शिक्षा घडवण्याचे अधिकार आपल्या हातात आले असताना ते अधिकार राबवणे अवघड आहे. हे त्यांनी मान्य केले आहे. पण तरीसुध्दा त्यांच्या आरोपाच्या फैरी काही थांबत नाहीत. आचारसंहितेचा भंग करून सभा घेणे, मिरवणुका काढणे, उच्च न्यायालयाच्या परिसरात रोड शो करणे अशा प्रकारांनी ते कायदा सुव्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून त्यांना नेमके काय साधायचे आहे. याचा काही नियोजित कार्यक्रम त्यांच्या डोळ्यासमोर तरी आहे का नाही असा प्रश्‍न पडतो. त्यामुळेच त्यांनी आम आदमी पाटी स्थापन केली तेव्हा त्यांच्या सोबत कामाला लागलेले त्यांचे सगळेच सहकारी आता त्यांच्यापासून दूर जायला लागले आहेत.

Leave a Comment