मुंबई- गेल्यां चार दिवसांपासून मनसे-भाजप नेत्यांच्या जवळकीमुळे सेनेत नाराजी पसरली आहे. काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये केवळ शिवसेनेच्या विरोधातच मनसेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मनसे- भाजपच्या कार्यकर्त्यांची सेनेला मदत मिळण्याची शक्यता दुरावली आहे. अशा परिस्थितीत शिवसेना नेतृत्व म्हाणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केवळ भाजपला केवळ सवाल विचारणार का आगामी काळात सेना उमेदवारांचा पराभव उघड्या डोळ्यांनी पाहत बसणार आहेत. असा सवाल पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
महायुतीतील नेते युती बळकट करण्याूसाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांनी मनसेशी गुफ्तगु वाढविले. मनसेशी जवळीक वाढविण्यामागे महायुतीलाच फायदा होणार असून मनसेने निवडणूक न लढविल्यास महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील, असे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केल्याचे उघड झाले.
आगामी काळात पक्षाने सर्व शक्ती पणाला लावली तर दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, वायव्य मुंबईतून गजानन किर्तीकर आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे निवडून येण्याची ब-यापैकी शक्यता आहे. मात्र आता त्यांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिल्याने मतांचे विभाजन अटळ असल्याने पुन्हा काँग्रेस आघाडीचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यातून निवडून येणाऱ्या या जागा पडल्यास त्यामुळे होणारे नुकसान पक्ष नेतृत्व कसे थांबविणार, असा सवाल एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने उपस्थित केला. पक्षनेतृत्वाने लागलीच युती तोडावी, असे आमचे म्हणणे नाही. मात्र भाजपच्या नेत्यांवर दबाव आणून त्यांच्या माध्यमातून मनसेला लगाम करण्याची धमक त्यांनी ठेवायला हवी, असे मतही अन्य एका पदाधिका-याने व्यक्त केले. त्यामुळे आागमी काळात शिवसेना काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.