अब्जावधींचा खजिना पोटात असलेले कमरूनाग सरोवर

हिमाचल या भारताच्या देवभूमीत निसर्गसौंदर्याची अगदी रेलचेल आहे. पर्यटकांचे मन लुभावतील अशी अनेक स्थळे या राज्यात आहेत त्याचबरोबर महाभारतात उल्लेख असलेली अनेक धार्मिक स्थळेही येथे आहेत. त्यापैकी एक म्हणजे कमरूनाग मंदिर आणि मंदिराजवळ असलेले भव्य सरोवर. मंडीपासून ६० किमीवर असलेले हे स्थळ भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. पहाड आणि दाट जंगलातून येथे जावे लागते. त्यासाठी रोहिडा येथून ८ किमीचा चढ चढावा लागतो.

या स्थळाची महती अशी की कमरूनाग हे मोठे देवपुरूष मानले जातात. आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात असा विश्वास आहे. आणि मनोकामना पूर्ण झालेले भाविक या मंदिराजवळ असलेल्या कमरूनाग सरोवरात नोटा टाकतात, महिला दागिने टाकतात. ही परंपरा फार प्राचीन आहे आणि त्यामुळे या सरोवरात अब्जावधीचा खजिना दडला आहे असे सांगितले जाते. मात्र कमरूनाग या खजिन्याचे संरक्षण करतात त्यामुळे तो कुणाला चोरून नेता येत नाही.

कमरूनाग हा पावसाचा देव असेही मानले जाते. दरवर्षी जून महिन्यात येथे यात्रा भरते आणि हा खडतर प्रवास करून लक्षावधी भाविक येथे येतात. महाभारतात कमरूनाग यांचा उल्लेख येतो तो बबसभान नावाने. हा घटोत्कचाचा पुत्र असेही म्हटले जाते. पृथ्वीतलावरच्या या शूर योद्ध्याची हार कृष्णनितीमुळे झाली.

याची अशी गोष्ट सांगतात की कौरव पांडव युद्धात ज्याची हार होताना दिसेल त्याच्या बाजूने लढण्याचा कमरूनाग यांनी निश्चय केला होता. यामुळे कृष्णाच्या मनात भीती निर्माण झाली. त्याने कमरूनागाला पैजेत हरविले आणि त्याचे मस्तक मागितले. हे मस्तक त्याने हिमालयाच्या शिखरावर ठेवले जेणेकरून त्याला कौरव पांडव युद्ध दिसू शकेल. पण नंतर असे लक्षात आले की जिकडे हे मस्तक फिरतेय त्या बाजूची सरशी होते आहे. शेवटी कृष्णाने हे मस्तक दोरीने दगडाला असे बांधले की ते फक्त पांडवांची बाजूच पाहू शकेल आणि अशा तर्हेटने पांडव युद्ध जिकले. भीमाने कमरूनागाला पाणी मिळावे म्हणून हे सरोवर तयार केले.

कमरूनागाचे मंदिर पूर्ण लाकडात बांधलेले असून आत अती प्राचीन अशी मूर्ती आहे. कमरूनाग भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतो मात्र त्यासाठी कमरूनागाच्या मूर्तीवर कांहीही चढावा चढवायचा नाही तर आपले दान सरोवरात करायचे. कमरूनागाला जेव्हा नैवैद्य दाखविला जातो त्याच वेळेत हे दान करण्याचे पुण्य अधिक मानले जाते. या सरोवरात अशा प्रकारे गेली कित्येक शतके पैसे, दागिने दान केले जात आहेत आणि ते सरोवराच्या पोटात सुरक्षितही आहेत.

Leave a Comment