आता गोपीनाथ मुंडे नाराज

मुंबई- महायुतीमधील नाराजीचा सिलसिला गेल्या काही दिवसांपासून थांबायला तयार नाही. दोन दिवसापूर्वी नाराज असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांना मोठी धावपळ करावी लागली. ती थांबते न थांबते तोच आता गोपीनाथ मुंडे नाराज झाल्याने महायुतीमधील रुसव्याफुगव्यांची मालिका सुरूच आहे.

भाजपची उमेदवार निवडीसंदर्भात बुधवारी बैठक झाली. या बैठकीला गैरहजर राहून मुंडेंनी नाराजी दाखवून दिली. राज्यात यापुढे पक्षाचे निर्णय प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसच घेतील, असे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूडींनी सांगितल्याने मुंडे नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
काही दिवसापूर्वीच महाराष्ट्रारतील लोकसभा, विधानसभेची सर्व जबाबदारी भाजपने मुंडेंवर सोपवली होती. मुंडेंनीच रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी व राष्ट्रीय समाज पक्षांना एकत्र आणले. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावताना मुंडे यांनी चांगली वातावरण निर्मिती केली. पण अशातच त्यांच्याकडून सूत्रे काढून घेत फडणवीसांकडे देण्याच्या रूडींच्या निर्णयाने मुंडे नाराज झाल्याचे समजते.

भाजपमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार नक्की कोणाकडे आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. पक्षश्रेष्ठींवर आपण नाराज नाही, असे सांगत मुंडेंनी वेळ मारून नेली. ते म्हणाले, पक्ष सांगेल ती जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा पक्षश्रेष्ठींचा आहे. यादी आधीच ठरलेली असते. त्यात राज्यातील नेत्यांसाठी काही काम करायचे शिल्लक नसते. त्यामुळे या बैठकीला मी हजर न राहिल्याने फरक पडत नाही. असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Comment