पुणे,दि.11: महाराष्ट्रात मोठ्या प्रयत्नाने जम बसवणारा फळबागांचा नव बागायतदार गेल्या पंधरा दिवसातील गारांच्या पावसामुळे पाच वर्षे मागे गेला आहे. त्याचे नुकसान किती झाले व त्याला शासन काही भरपाई देणार का, हा मुद्दा जरी चर्चेत असला तरी सर्वात महत्वाचे मुद्दे म्हणजे या संकटाची चाहूल घेता आली असती का व फळबागाईतासाठी घेतलेल्या पाच लाखापासून वीस पंचवीस लाखापर्यंतच्या कर्जाच्या बोजातून मार्ग काढता येत नाही म्हणून त्याने काही टोकाचा वाईट निर्णय घेण्याआधी त्याला विश्वासात घेणारी काही यंत्रणा आहे का खरा कळीचा मुद्दा आहे.
गारांचा पाउस येण्यापूर्वी आठ दिवस संपूर्ण दक्षिण भारतात जवळ जवळ पंधरा दिवसांचा पावसाळ्यासारखा पाऊस येतो आहे, असे वातावरण निर्माण झाले होते याची प्रचीती डॉ रामचंद्र साबळे यांनी अनेक उदाहरणासह दिली. असे निरीक्षण जर एका संशोधकाला येवू शकते तर गेली वीस पंचवीस वर्षे हवामान शास्त्रात मोठी संशोधने केल्याचा दावा करणारे अनेक रिमोट सेंसिंगचा दावा करणारे महासंगणक सेवत असताना अशा गारांच्या शक्यतेची पूर्वसूचनाही दिली जावू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील गेल्या दहा वर्षात सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे शेतीच्या कर्जाला कंटाळून काही हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या व आत्महत्यापेक्षा दुदैंवी घटना म्हणजे अशा घटनांतून मार्ग काढण्यासाठी जी केंद्रांने मदत जाहीर केली ती संबंधितापर्यंत पोहोचलीच नाही. या दोन अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या फळबागासाठी नव्याने धडपडणार्या नव्या तरुणांच्या गटाला कसे सहकार्य होणार हा महत्वाचा मुद्दा झाला आहे. महाराष्ट्रात फळबागा पिकवणार्या तरुणांनी गेल्या पाच वर्षात चांगली प्रगती केली होती. त्यात त्यांनी निर्यातीपर्यंत मजल मारली होती. त्यांना समजून घेणारी एखादी यंत्रणा या सध्याच्या आणिबाणीच्या काळातही उभी करता येईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात या गारपिटीने दहा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र अडचणीत आले आहे.
पंचवीसपेक्षा अधिक जिल्ह्यात ते नुकसान पोहोचले आहे. महाराष्ट्रातील नुकसानीची आपण अधिक काळजीपूर्वक चर्चा करत आहोत पण मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व कर्नाटकातही हा गारांचा पाउस झाला आहे. अशा संकटाची पूर्वसूचना देता येते का ही गांभिर्याने विचार करण्यासारखी बाब आहे. अनेक शास्त्रज्ञांच्या मते ही बाब विज्ञानाला पूर्ण शक्य आहे. पण असे पूर्व कथन राज्यकर्त्यांना खरेच हवे असते का,असा महत्वाचा मुद्दा आहे. कारण यावर फक्त चर्चा होतेे पण प्रत्यक्षात निर्णय घेण्याच्या वेळी काहीच केले जात नाही. सहा महिन्यापूर्वी फियान वादळाच्या वेळी वेधशाळेने पूर्वसूचना दिली होती पण आठ महिन्यापूर्वी केदारनाथचे ढगफुटीचे वादळ आले त्याची पूर्वसूचना दिली नव्हती. भारतात परमसंगणक करणारांची व त्याचा वापर करणारांची संख्या मोठी आहे पण तरीही अशी निसर्गाची दुर्दैवी घटना घडली प्रत्येक जण बचावाचा पवित्रा घेतो अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सध्या निवडणुकीचे वातावरण असले तरी यावर तातडीने राष्ट्रीय परिषद बोलावण्याची गरज आहे.