क्वालालंपूर- चार दिवसांपासून बेपत्ता असलेले मलेशिया एअरलाइन्सचे विमान हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या पडद्यावरून नाहीसे झाल्यानंतर मार्ग बदलून सुमारे एक तास उडत होते आणि या विमानाने पश्चिम दिशेला मलाक्काच्या सामुद्रधुनीवरून हा प्रवास केल्याची नवी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे या बेपत्ता विमानाचा गुंता आणखी वाढला आहे. मलेशियाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान नाहिसे झाल्यानंतर मलेशियाच्या पूर्व किनारपट्टीवरील कोटा भरू हे शहर आणि व्हिएतनामचे दक्षिण टोक यांच्या दरम्यान ३५००० फुटांवर उडत होते. कोटा भरू शहरावरून पुढे गेल्यावर या विमानाने मार्ग बदलला आणि ते कमी उंचीवरून उडू लागले आणि त्याने मलाक्काच्या सामुद्रधुनीत प्रवेश केला.
मलेशियाच्या पश्चिम किना-यावर असलेल्या मलाक्काच्या सामुद्रधुनीत जहाजांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते. या भागात हे विमान शनिवारी पहाटे २.४० वाजता उडत असल्याची नोंद लष्कराच्या रडारवर आहे, अशी माहिती मलेशियाचे हवाई दल प्रमुख रोदझाली दौड यांनी दिली. त्या वेळी हे विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेकडीला टोकाला असलेल्या पुलाऊ पेराक बेटाजवळ ९००० फुटांवर उडत होते. त्यानंतर त्याच्याकडून येणारे संदेश बंद झाले. या वृत्ताची शहानिशा केली जात असल्याची माहिती एका बिगर लष्करी अधिका-याने दिली आहे. अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत असून त्यांची पडताळणी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून केली जात आहे. जर हे वृत्त खरे मानले तर, हे विमान योग्य उंचीवरून उडत होते आणि या विमानाने त्यातील संदेश प्रसारित करणारी यंत्रणा बंद करून सुमारे ५०० किमी प्रवास केला, असा अर्थ त्यातून निघू शकतो. या नव्या माहितीमुळे आता मलेशियाने त्यांची शोधमोहीम मलाक्काच्या सामुद्रधुनीवर केंद्रित केली आहे.