खासदार बाबर यांचा शिवसेनेला “जय महाराष्ट्र’

पिंपरी – शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची नसून, केवळ धनदांडग्यांची व पैसेवाल्यांची आहे. मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही, असा सनसनाटी आरोप करीत खासदार गजानन बाबर यांनी मंगळवारी शिवसेनेला “जय महाराष्ट्र’ केला.  पिंपरी-चिंचवड शहरातून तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार आणि आता खासदार असलेले बाबर पक्षाचे गेली 45 वर्षे निष्ठेने काम करीत आहेत; परंतु पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली असून, पाच वर्षांपूर्वी कॉंग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेले श्रीरंग बारणे यांना दिल्याने अत्यंत मवाळ, संयमी स्वभावाचे गजानन बाबर सेनेवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.  

मावळ मतदारसंघात सर्वच पक्षांत प्रचंड राजकीय “गारपीट’ झाली असून, राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडाचा झेंडा फडकावून शेकापच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहणार असल्याचे जाहीर केले;तर विद्यमान खासदार गजानन बाबर यांनी थेट “मातोश्री’वर हल्लाबोल केला आहे.  “”राजकारणात भ्रष्ट मार्गाने पैसा कमविला नाही. गुन्हेगारी कृत्ये केली नाहीत किंवा कोणाकडून खंडणी स्वरूपात पैसा घेतला नाही. केवळ सर्वसामान्य नागरिकांची सेवा करीत आलो, हा माझा गुन्हा आहे का? प्रामाणिक माणसाला पक्षात काही किंमत राहिली नसून, केवळ पैसेवाल्यांना महत्त्व आले आहे. माझ्या उमेदवारीमुळे काही कोटी रुपये पक्षाला मिळणार नाहीत, अशी शंका आल्याने आपली उमेदवारी कापली,” असे बाबर म्हणाले. 

आपण आजपासून पक्षाचे काम थांबवत असून, पक्षाला शेवटचा “जय महाराष्ट्र’ करीत आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली. पक्षाचा राजीनामा दिला असून, पुढील भूमिका आठ दिवसांत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  “”कॉंग्रेस विचारसरणीचा पगडा असणारे श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊन प्रामाणिक शिवसेना कार्यकर्त्यावर प्रचंड अन्याय केला आहे. मी बारणे यांचे काम करण्यास मोकळा नाही,” असे सांगून “”माझ्यासारख्या प्रामाणिक माणसावर केलेल्या अन्यायाचे पाप शिवसेना उमेदवाराला फेडावे लागेल,” असा इशाराही बाबर यांनी दिला.  मनसे नेते आमदार बाळा नांदगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, “”खासदार बाबर आमच्या संपर्कात असून, आमची सध्यातरी शेकापसोबत आघाडी आहे. त्यामुळे बाबर यांनी प्रथम पक्षात प्रवेश करावा. त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल.” शिवसेनेत प्रामाणिक माणसाला किंमत राहिली नाही. केवळ धनदांडग्यांना महत्त्व आले आहे, या बाबर यांच्या आरोपात तथ्य असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.  

दरम्यान, बाबर यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला असून, अनेक नगरसेवक, कार्यकर्ते सेनेला “जय महाराष्ट्र’ करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांच्यासमोर प्रचंड अडचणींचा डोंगर उभा राहण्याची शक्‍यता आहे.  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाबर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, “”माझ्यावर आरोप करण्याची सध्या फॅशनच झाली आहे. उमेदवारी मी नाही, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवितात. हेच बाबर यांना माहिती नसावे, याची कीव वाटते.” ज्या झाडाला फळे असतात, अशा झाडावर लोक दगड मारतात, असा उपरोधिक टोला नार्वेकर यांनी लगावला.

Leave a Comment