काँग्रेस, भाजपच्या उमेदवारांच्या नावावरून स्पष्ट होईल मनसेची भूमिका

पुणे/ विशेष प्रतिनिधी-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला. त्याचवेळी पुण्यात भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात दीपक पायगुडे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पुण्यातील समीकरणे बिघडली असल्याची चर्चा सुरू झाली असून काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांच्या नावावरूनच मनसेची नेमकी पुण्यातील भूमीका स्पष्ट होईल असे राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे.

गेली पाच वर्षे राज्यात अन पुण्यातही मनसेची भूमिका ही काँग्रेसला पूरक राहिली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत कलमाडी यांच्या विरोधात मनसेने पायगुडे यांना उमेदवारी देण्याऐवजी रणजीत शिरोळे या नवख्या उमेदवाराला लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते. शिरोळे यांचे वडील श्रीकांत शिरोळे हे सुरूवातीला काही दिवस कलमाडी हाऊसवर निवडणुकीच्या तयारीसाठीही जात होते. पण अचानक रणजीत शिरोळे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचे हाऊसवरचे जाणे बंद झाले.

त्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला 75 प्लस मत मिळाली होती अन भाजपचे अनिल शिरोळे यांचा 25 हजार मतांच्या फरकाने काँग्रेसच्या कलमाडी यांनी पराभव केला होता. त्यावेळी पुण्यातून भाजपला लोकसभेसाठी हवातसा उमेदवार मिळत नव्हता. माजी खासदारांनी निवडणूक लढवायला नकार दिला होता. मात्र यावेळी त्यांनी गेल्या दोनतीन आठड्यापासून पुन्हा निवडणूक लढवायची तयारी दाखवली आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीत कोणी उमेदवार नाही म्हणून अनिल शिरोळे यांना ऐनवेळी तिकीट दिले अन ते पराभूत झाले.

यावेळी तर काँग्रेसकडून कलमाडी हे उमेदवार म्हणून येणारच नाहीत हे उघड आहे. पुण्यासाठी कलमाडी यांनी मीरा कलमाडी यांच्यासाठी आग्रह धरला आहे. या शिवाय आमदार विनायक निम्हण, युवका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, शहराध्यक्ष अभय छाजेड आणि आमदार मोहन जोशी, दीपक मानकर, कमल व्यवहारे आदी इच्छुक आहेत. भाजपकडे शिरोळे यांच्या शिवाय बापट, जावडेकर, रावत यांचीही नावे चर्चेत आहेत.

यापैकी काँग्रेस आणि भाजप कोणाल तिकीट देणार त्या नावांवरूनच दोन्ही पक्ष निवडणूक लढवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी किती गंभीर आहेत हे स्पष्ट होईल. दुसरीकडे मोदींच्या पाठिंब्याची घोषणा करणा-या राज ठाकरे यांच्या मनसेला पुण्यातील सीट बाय म्हणून दोन्ही पक्ष देणार का हे उमेदवारांच्या नावावरून स्पष्ट होणार आहे. निदान आजतरी चर्चा अशीच आहे की पुण्यातील जागा मनसेला द्यायची असेच दोघांचा अघोषित धोऱण आहे. पण असे करताना भाजपची एक जागा कमी करण्याचेही पाप त्या पक्षाच्या नेत्यांच्या हातून होणार आहे. त्यामुळे पुण्यातील जागा लढवण्यामागे मनसेचे नेमके धोरण काय आहे हे अन्य दोन प्रमुख उमेदवरांच्या नावावरूनच स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment