मुंडे-गडकरी गटात पुन्हा धुसफूस

पुणे– आगामी काळात होत असलेल्या‍ ऐन लोकसभा निवडणूकीच्यात तोंडावर भाजपच्यान नेत्यांमधील वाद पुन्हा सुरू झाला आहे. भाजपचे संसदीय उपनेते गोपीनाथ मुंडे व माजी अध्यक्ष नितीन गडकर यांच्या गटांत पुन्हा उमेदवारी देण्याच्या कारणावरून वाद उफळून आला आहे. गेल्या काही दिवसांत गडकरी आणि त्यांच्या गटाने मुंडे यांना घेरण्याची पुन्हा तयारी केल्याचे दिसते. आगामी काळात या सर्व प्रकाराला मुंडे कसे उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

काही दिवसापूर्वीच गडकरी हे अध्यक्षपदावरून पायउतार झाले आणि मुंडे यांच्याकडे महाराष्ट्रातील निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे पक्षातील गटबाजी काही काळ थंडावली होती. परंतु, आता निवडणुकीच्या तोंडावरच ही अंतर्गत स्पर्धा पुन्हा सुरू झाली आहे.लोकसभा निवडणूकीपूर्वी शिवसेनेशी जुळवून घेत त्यांवनी रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेऊन महायुतीची मोट बांधण्यात मुंडे यांचा मोठा वाटा आहे. त्यातून नवी सामाजिक समीकरणे तयार करून लोकसभेबरोबरच विधानसभेचीही पूर्वतयारी त्यांनी सुरू केल्याचे सांगण्यात येत होते.

काही दिवसापूर्वीच गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन खळबळ उडवून दिली. राज ठाकरे यांच्या मोदी पाठिंब्याचे गडकरी यांनी स्वागत केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. मुंडे यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी असताना गडकरी यांच्या या खेळीमुळे एकीकडे शिवसेनेत आणि दुसरीकडे मुंडे गटातही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

त्यातच आता लोकसभेसाठी उमेदवारी देतानाही मुंडे यांच्या समर्थकांना दोन पावले मागे घ्यावी लागली. ईशान्य मुंबईतून पूनम महाजनांऐवजी किरीट सोमय्या आणि नगरमधून प्रताप ढाकणे यांच्याऐवजी दिलीप गांधी यांना उमेदवारी देण्यात आली. आता पुण्यातून अनिल शिरोळे यांच्यासह गिरीश बापट, प्रकाश जावडेकर आणि प्रदीप रावत हे स्पर्धेत आहेत. तसेच भिवंडी, लातूर आणि उत्तर मध्य मुंबईतून मुंडे समर्थकांसह अन्य गटांच्या नेत्यांनीही उमेदवारी मागितली आहे. त्या मुळे मुंडे गट व गडकरी गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्यामुळे आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.