मोदींना पठिंबा देण्यासाठी रेस- उध्दव ठाकरे

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून देशात नरेंद्र मोदी यांची लाट आली आहे. त्यामुळेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची जणू सध्या रेस सुरू आहे. कोणीपण उठून सध्या मोदी यांना पाठिंबा देत आहे, अशा शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला हाणला.

रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढवणारच असे स्पष्ट करतानाच जे खासदार निवडून येतील ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देतील अशी घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवरच शिवसेनेचे मुखपत्र असणा-या ‘सामना’च्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

काही जणांनी मोदी यांना पाठिंबा न देता परवापर्यंत मोदी यांना लाखोल्या वाहत होते. राज्यातील काही आरंभशूर पुढारीही आज ‘मोदी- मोदी’ करत त्यांना न मागता पाठिंबा देत आहेत. वातावरण बदलत असल्याचा यापेक्षा मोठा पुरावा तो कोणता? असंही यावेळी बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

भाजप नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे शिवसेना व भाजपमध्ये नाराजी असल्याच्या चर्चेबाबतही या लेखात टीका करण्यात आली आहे. शिवसेना-भाजपचे नाते टिकेल की नाही, या प्रश्नाचे ओझे वाहून स्वत:ला त्रास करून घेण्याची गरज इतरांना नाही, असे सांगत भाजपसोबत सेनेचे नाते हे देशाच्या राजकारणातील सगळ्यात जुने नाते असल्याचे लेखात म्हटले आहे.

Leave a Comment