क्वालालंपूर- मलेशियातील क्वालालंपूर कडून बिजिंगकडे जाणारे मलेशियन एअरलाईनचे विमान बेपत्ता होऊन तीन दिवस उलटून गेल्यानंतरही या विमानाचा कांहीही शोध लागू शकलेला नाही. अनेक देश या शोध मोहिमेत सामील झाले असून अमेरिका चीनसह अन्य १० देशांची ४० जहाजे आणि ३४ छोटी मोठी विमाने व हेलिकॉप्टरर्स या विमानाचा शोध घेण्याच्या कामी कार्यरत आहेत. मात्र अद्याप तरी त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
या विमानाचा शेवटचा संपर्क जेथून झाला तेथपासून ५० नॉटिकल मैल परिघात या विमानाचा शोध घेतला जात आहे. मलेशियन विमान वाहतूक विभाग प्रमुख अजहरूद्दीन अब्दुल रहमान यांनी विमानाशी संबंधित कोणतीही वस्तू अद्यापी सापडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले अपहरणापासून सर्व शक्यतांचा विचार केला जात आहे कारण या विमानातून दोन प्रवासी बनावट पासपोर्टवर प्रवास करत होते असे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रवाशाचे बुकींग इराणी एजंटाकडून केले गेले होते.