पुण्यात ‘मनसे’ उमेदवारीने भाजपची उडाली झोप!

पुणे- राज ठाकरे यांनी पुण्यात दीपक पायगुडे यांना उमेदवारी दिल्याने ‘भाजप’ चांगलाच अडचणीत सापडला आहे. मनसेने उमेदवार जाहीर करण्यापूर्वी काँग्रेस-भाजप अशी लढत रंगणार होती. मात्र, आता भाजप-मनसे एकमेकांची मते घेण्याची शक्यता असल्याने ‘भाजप’मध्ये चिंतेचे, तर काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. गेल्या चार दिवसांपासून मनसेमध्ये वेगाने हालचाली झाल्या आणि पायगुडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. अपेक्षेप्रमाणे रविवारी त्यांचे नाव घोषितही झाले. त्याला ठाकरे यांनी ‘नमो’ची जोड दिल्यामुळे पुण्यातील मोदी समर्थक मतदारांना पर्याय उपलब्ध झाला खरा. पण, भाजपचे टेंशन मात्र वाढले. कारण मागील निवडणुकीत मनसेच्या रणजीत शिरोळे यांना ७६ हजार मते पडली होती, तर भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांचा काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांनी २५ हजार मतांनी पराभव केला होता. 

भाजपच्या पराभवाला मनसेची उमेदवारीच कारणीभूत ठरली होती. त्याचीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. मनसेकडून दीपक पायगुडे निवडणूक रिंगणात उतरल्याने गेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याच्या धास्तीने भाजपची झोप उडाली आहे. मनसेने आजपर्यंत लढविलेल्या निवडणुकीतील आकडेवारी लक्षात घेतली तर पुण्यात मनसेची निर्णायक ताकद असल्याचे लक्षात येईल. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत मनसेला ७६ हजार मते मिळाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच जागा लढवून एक लाख ७६ हजार मते मिळाली. तर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे २९ उमेदवार निवडून आले असून या सर्व उमेदवारांना मिळून दोन लाख १७ हजार मते मिळाली. प्रत्येक निवडणुकीतील मतदानाचे पॅटर्न वेगळे असले, तरी शहरात मनसेची निर्णायक ताकद असल्याचे दिसते. 

दीपक पायगुडेंच्या उमेदवारीचा काँग्रेसला फायदाच होणार आहे. राज ठाकरे यांनी मनसेचे निवडून आलेले खासदार पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पािठबा देतील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे पुण्यात मोदींना मते देऊ इच्छिणा-या मतदारांना पायगुडे यांच्या उमेदवारीने आणखी एक पर्याय उभा राहिल्याने पुन्हा युतीच्या मतांमध्ये विभागणीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील भाजपच्या नेत्यांची आणि इच्छुकांची पंचाईत झाली आहे. प्रतिस्पर्धी ठरू पाहणा-या मनसेच्या भूमिकेचे राष्ट्रीय नेत्यांनी स्वागत केले. मात्र, आता स्थानिकांनी काय भूमिका घ्यावी, असा पेच निर्माण झाला आहे. आमदार व महापालिकेतील प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर पायगुडे हे निवडणुकीत चांगली लढत देऊ शकतात. त्यामुळे आता पुण्यात भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी हा काँग्रेस नसून मनसे असणार आहे. 

आता भाजप आणि काँग्रेस कोणता उमेदवार देते यावर शहरातील राजकीय गणिते बदलणार आहेत. दीपक पायगुडे हे गेल्या पंचवीस वर्षापासून शहराच्या राजकारण-समाजकारणात आहेत. काही काळापूर्वी फक्त मतविभागणीपुरते चच्रेत असलेल्या मनसेने लोकसभा निवडणुकीत मात्र विजयी दावेदारांपैकी एक म्हणून मुसंडी मारली आहे. पायगुडे हे जुन्या शिवसनिकांपैकी एक. ते राज ठाकरे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षापासून पायगुडे सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी शैक्षणिक संस्था आणि सहकारी बँकेचे कामकाज वाढवले. फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सनिक विद्यालय, पाषाण येथील ई स्कूल, तसेच लोकसेवा सहकारी बँक, लोकसेवा बाजार अशा विविध संस्था सुरू करून ते समाजकारणात सक्रिय आहेत. दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पायगुडे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आणि पुण्यातील संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली.

Leave a Comment