मस्कत – ओमानच्या एका न्यायालयाने दोघा भारतीयांसह सात जणांना लाचखोरीच्या एका प्रकरणात १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या सात जणांना भ्रष्टाचाराच्या पाच प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये गल्फार इंजिनिअरिंग या कंपनीचा माजी कार्यकारी संचालक पी. महंमद अली आणि या कंपनीचा व्यवस्थापक या दोघा भारतीयांचा समावेश आहे. टाईम्स् ऑफ ओमान या दैनिकाने दिलेल्या या बातमीत या व्यवस्थापकाचे नाव नमूद केलेले नाही.
शिक्षा झालेले अन्य पाच जण ओमानचे नागरिक आहेत. त्यांनी एका तेल कंपनीच्या अधिकार्यांना लाच दिली, असा त्यांच्यावर आरोप आहे. पी. महंमद अली याला १७ लाख ७४ हजार ओमानी रियाल्स् (२ लाख ५९ हजार डॉलर्स) एवढा दंडही द्यावा लागणार आहे. त्याच्याबरोबर शिक्षा झालेल्या भारतीय व्यवस्थापकाला ५ लाख ३४ हजार ओमानी रियाल्स् एवढा दंड ठोठावला गेला आहे.
या लोकांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दोघा भारतीयांना त्यांच्या देशात परत पाठवून देण्यात यावे, असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. पी. महंमद अली हा मुळातला केरळचा राहणारा असून त्याने गल्फार इंजिनिअरिंग ही कंपनी स्थापन केली आहे. गल्फार ही ओमानमधली आघाडीची बांधकाम कंपनी मानली जाते.